प्राचीन तंत्रज्ञानाचा वापर करून गोव्यात जहाजबांधणी होणार !

भारताची प्राचीन कला जगासमोर येणार ! – मीनाक्षी लेखी, केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री

भारताची प्राचीन जहाजबांधणी कला !

पणजी, १२ सप्टेंबर (वार्ता.) – प्राचीन तंत्रज्ञानाचा वापर करून जहाज बांधण्याचा अनोखा उपक्रम गोव्यातील छोट्या बेटावर हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे भारताची प्राचीन कला जगासमोर येणार आहे. जहाज बांधणीनंतर सागरी परिक्रमेचेही आयोजन करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी केले. ‘होडी इनोव्हेशन्स प्रा.लि.’ हे जहाजबांधणी करणारे आस्थापन, भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि भारतीय नौदल यांनी अलीकडेच त्रिपक्षीय करार केला आहे. भारताचा प्राचीन सागरी वारसा पुनरुज्जीवित करणे, हा या मागचा उद्देश आहे. या उपक्रमाचे केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी नौदलाचे प्रमुख ॲडमिरल आर्. हरि कुमार यांचीही उपस्थिती होती.

त्या पुढे म्हणाल्या,

‘‘भारताला पुष्कळ समृद्ध आणि प्राचीन सागरी परंपरा लाभलेली आहे आणि यामुळे प्राचीन तंत्राचा वापर करून जहाज बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य संजीव सान्याल यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे.’’

भारताचे जहाजबांधणीचे प्राचीन तंत्रज्ञान २ सहस्र वर्षे जुने !

भारत देशाचे जहाजबांधणीचे (‘स्टिचिंग’चे) प्राचीन तंत्रज्ञान २ सहस्र वर्षे जुने आहे. लाकडावर पारंपरिक डिंक आणि तेल वापरून प्राचीन तंत्राने जहाज बांधले जात असे.

युरोपमधील जहाजे भारतात येईपर्यंत हे तंत्रज्ञान येथे अस्तित्वात होते आणि नंतर ते लोप पावले. पुरातन काळात महासागरात जाणार्‍या जहाजांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असे. वर्ष २०२५ मध्ये भारतीय नौदल या प्राचीन तंत्रज्ञानानुसार बांधलेल्या जहाजावरून सागरी परिक्रमा करणार आहे.