‘इंडिया’ आघाडीची स्थापना सनातन धर्माला नष्ट करण्यासाठीच झाली !

तमिळनाडूतील द्रमुकचे नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री के. पोनमुडी ‘इंडिया’ आघाडीचा खरा उद्देश केला उघड !

द्रमुकच्या सरकारमधील शिक्षणमंत्री के. पोनमुडी

चेन्नई (तमिळनाडू) – देशातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची निर्मिती सनातन धर्माला नष्ट करण्याच्या एकमेव उद्देशाने करण्यात आली आहे, असे विधान तमिलनाडूतील द्रमुक या पक्षाच्या सरकारमधील शिक्षणमंत्री के. पोनमुडी यांनी केले. ते येथील सनातन निर्मूलन संमेलनात बोलत होते. (जिहादी आतंकवादामुळे ‘इस्लाम निर्मूलन’, ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराच्या कारवायांमुळे ‘ख्रिस्ती निर्मूलन’ आदी नावाने संमेलन भरवण्याचे धाडस भारतात कधीच कुणी करत नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक आहेत ! – संपादक) या विधानावर भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी  ‘जे मनात होते, तेच ओठावर आले’, अशा शब्दांत टीका केली आहे.

पोनमुडी पुढे म्हणाले की, ‘इंडिया’ आघाडीचा उद्देश सनातन धर्माच्या सिद्धांतांच्या विरोधात लढणे, हा आहे. या आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद होऊ शकतात; मात्र यांतील २६ पक्ष सनातन धर्माच्या विरोधातील लढाईसाठी संघटित आहेत. जेव्हा सनातन धर्माला नष्ट करण्याची गोष्ट असते, तेव्हा आम्ही सर्व याच एका सूत्रावर सहमत होतो. आम्ही सर्व एकच गोष्टीची अपेक्षा करत आहोत, ती म्हणजे समानता, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांकांचे संरक्षण, लैंगिक समानता. आमच्या द्रविड धोरणामुळे राज्यात महिलांना आरक्षण मिळाले आहे. त्यापूर्वी महिलांना घरातच कोंडले जात होते.

पोनमुडी यांच्याकडून दलितांचा अवमान !

पोनमुडी यांनी भाषणाच्या वेळी उपस्थितांना विचारले, ‘या गावातील सरपंच कोण आहेत ? या अम्मा ज्या दलित समाजातील आहेत, अनुसूचित जातीमधील आहेत.’ या महिलेकडे अपमान करण्याच्या दृष्टीने पहात विचारले की, तुम्ही दलित आहात ना ? तुम्ही अनुसूचित जातीमधील आहात ना ? पोनमुडी यांच्या अशा बोलण्यावरून येथे उपस्थित लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला. याविषयी दलित कार्यकर्त्या शालिनी मारिया लॉरेन्स यांनी ट्वीट करून म्हटले की, पोनमुडी यांनी या अवमानासाठी क्षमा मागितली पाहिजे. (यातून द्रविड नेत्यांची दलितांविषयीची खरी मानसिकता लक्षात येते ! देशातील दलित नेते यास विरोध करतील का ? – संपादक)

  • पोनमुडी यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने घातली होती धाड !  

  • जप्त केले होते ४१ कोटी ९० लाख रुपये !

सनातन धर्म संपवण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे शिक्षणमंत्री के. पोनमुडी आणि त्यांचे पुत्र खासदार गौतम यांच्या ठिकाणांवर जुलै मासामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) धाड टाकून त्यांच्याकडून ४१ कोटी ९० लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती.

असे भ्रष्टाचारी द्रविड नेते म्हणे सनातनला संपवणार ! केंद्रातील भाजप सरकारने अशा भ्रष्टाचारी नेत्यांना पकडून कारागृहात डांबले पाहिजे ! -संपादक

संपादकीय भूमिका

  • द्रमुक सनातनद्वेषी असून त्याचा जन्मच सनातनद्वेषातून झाला आहे, हे जगजाहीर आहेत; मात्र आता द्रमुकचे नेते पोनमुडी यांनी ‘इंडिया’ आघाडीचा खरा चेहरा उघड केल्यामुळे सनातन धर्मीय त्यांना धन्यवादच देतील ! या विधानाविषयी आता ‘इंडिया’ आघाडीतील नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, लालुप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आदींनी उत्तर द्यायला हवे !
  • अशा आघाडीलाच सनातन धर्मीय आगामी निवडणुकांमध्ये राजकीयदृष्ट्या नष्ट करतील यात शंका नाही ! सनातनला संपवण्याची भाषा करणारे स्वतः संपतात, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल !