‘इंडिया’ आघाडीतील पक्षांचा सनातन हिंदुविरोधी खरा चेहरा समोर आला आहे ! – नितेश राणे, प्रवक्ते, भाजप

उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी

भाजपचे प्रवक्ते तथा आमदार श्री. नितेश राणे

कणकवली – द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम्.के. स्टॅलिन यांचा मुलगा (उदयनिधी) सनातन धर्माविषयी बरळला, तर पी. चिदंबरम् आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मुलेसुद्धा सनातन हिंदु धर्माविषयी खालच्या भाषेत टीका करत आहेत. ए. राजा याने तर ‘सनातन हिंदु धर्म म्हणजे एड्स आहे’, अशी गंभीर टीका करून भाजपविरोधी ‘इंडिया’ आघाडीत सनातन हिंदु धर्माला कुठेच स्थान नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. या सर्वांचा विचार करता ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांचा सनातन हिंदुविरोधी खरा चेहरा समोर आला आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी येथे केली.

(सौजन्य : TV9 Marathi) 

‘इंडिया’ आघाडीतील पक्षांकडून सनातन हिंदु धर्मावर टीका होत असतांना  आघाडीतील घटक पक्ष असणारे उद्धव ठाकरे यांनी कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याविषयी आमदार राणे येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

या वेळी आमदार राणे म्हणाले,

१. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका मान्य नाही काय ? ज्या ‘मातोश्री’वर (उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानावर) आजपर्यंत सनातन हिंदु धर्माला सर्वांत अधिक समर्थन मिळाले, त्याच ‘मातोश्री’वर मूग गिळून गप्प रहाण्याची वेळ आली, याचाच अर्थ तुम्ही तुमचे हिंदुत्व विसरला आहात.

२. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:ची हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट करून ‘इंडिया’ आघाडीतील सनातन हिंदु धर्मावर टीका करणार्‍यांना उत्तर द्यावे.

३. सनातन हिंदु धर्माकडे कुणी वाकड्या नजरेने पाहू नये. जर सनातन हिंदु धर्माचा अवमान कोण करत असेल, तर त्यांना उत्तर कसे द्यायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे.

कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळेल !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समितीने मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी जो अहवाल दिला, तो मराठ्यांच्या मागासलेपणाचा अभ्यास करून दिला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या अहवालाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे भविष्यातही कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता स्वतंत्ररित्या मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि महायुतीचे सरकार ते देईल, असा विश्‍वास आमदार नितेश राणे यांनी या वेळी व्यक्त केला.