न्याहाळपाडा (ता. वाडा, जि. पालघर) – येथील एका तरुणाकडे बनावट नोटा बनवण्याचे साहित्य आढळून आले असून सदर तरुणाला मुंबईतील भायखळा (पूर्व) येथील पोलिसांनी १४ जानेवारी २०२४ या दिवशी अटक केली आहे. या प्रकरणी भायखळा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून आतापर्यंत एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. वर्ष २०२४ मध्ये वाडा तालुक्यातील विविध भागांत अवैध दारु खटले ३३, जुगार २, अवैध प्रवासी वाहतूक २८, अमली पदार्थ १ अशा प्रकारे अवैध धंद्यांवर न्यायालयीन कारवाई केली आहे. वाडा पोलीस ठाणे आणि परिसरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने विशेष मोहीम आणि महिन्यातून एकदा ‘ऑल आऊट ऑपरेशन ३ आयोजित करून गुन्हेगार पडताळणीसह अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानसभेतील तारांकित प्रश्नांमध्ये पालघर येथील बनावट नोटा बनवणार्यांसह अवैध धंदे करणार्यांवर केलेल्या कारवाईविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांनी सदर माहिती दिली.