राज्यात ‘फेक’ पनीरची विक्री

उपमुख्यमंत्र्यांकडून कारवाईचा आदेश

प्रतीकात्मक चित्र

मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – राज्यात ‘ॲनालॉग चीज’ या पदार्थाची अनेक ठिकाणी ‘ॲनालॉग पनीर’ किंवा ‘आर्टिफिशीअल पनीर’ या नावाने फेक पनीरची विक्री होत आहे. या फेक पनीरमध्ये दुधाचा समावेश नसतो. नागरिकांची फसवणूक करून अशा प्रकारे फेक पनीरची विक्री चालू आहे. असे फेक पनीर लहान मुलांना खायला दिले जात आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने याविरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

‘आर्टिफिशीअल पनीर’ आणि ‘ॲनालॉग पनीर’ हे खरे पनीर म्हणून विकले जात आहे. या पदार्थांच्या नमुन्यांची पडताळणी केल्यास त्याचे अहवाल अनेक महिने येत नाहीत, असे या वेळी विक्रम पाचपुते म्हणाले. यावर अजित पवार म्हणाले, ‘‘या प्रकरणी कारवाई करण्यासाठी नियम अधिक कडक करण्यात येतील. राज्यशासनाच्या हातात जे जे असेल, ती पावले आम्ही उचलू. आवश्यकता वाटल्यास केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यात येईल.’’