ठाणे, ६ सप्टेंबर (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणार्या अनधिकृत बांधकामांप्रकरणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाली. अनधिकृत बांधकामांवर ठोस कारवाई होत नसल्याचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मत मांडले. यावर उत्तर देतांना ‘यापुढे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. ‘कोणत्याही पद्धतीचे सोपस्कार पार पाडण्याऐवजी ही बांधकामे थेट निष्कासित करण्यात यावीत’, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व अधिकार्यांना दिल्या आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्री बोलत होते.
मनपा क्षेत्र में अनाधिकृत निर्माण पाया गया तो मनपा आयुक्त होंगे जिम्मेदार, उनके खिलाफ होगी कानूनी कार्रवाई – शंभुराज देसाई https://t.co/VkzZWs0GGe
— Police Mahanagar (@PoliceMahanagar) September 5, 2023
या वेळी अनधिकृत बांधकामांवर रेरा अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव चर्चेला आला. अनधिकृत बांधकामांवर कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याचे सांगत आमदार गणपत गायकवाड यांनी खेद व्यक्त केला. कारवाई न करता केवळ नोटीस देण्यात येते; मात्र अनधिकृत बांधकामे चालूच असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही अनधिकृत बांधकामांविषयी खेद व्यक्त केला. (अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेकडे यंत्रणा असतांनाही कारवाई करण्यासाठी लोकप्रतिनिधींना त्याची जाणीव करून द्यावी लागते यापेक्षा दुर्दैव ते काय ? – संपादक) ‘या सर्व अधिकार्यांच्या कामाचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही सादर केला जाईल’, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
संपादकीय भूमिका :अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ती होऊ देणारे प्रशासकीय अधिकारी शिक्षेस पात्र ! |