निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी लिहिले ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ !

  • ‘जी-२०’ परिषदेत सहभागी होणार्‍या राष्ट्रप्रमुखांना राष्ट्रपतींकडून भोजनाचे निमंत्रण

  • काँग्रेसला पोटशूळ !

नवी देहली – येथे येत्या ९ आणि १० सप्टेंबर या दिवशी ‘जी-२०’ परिषद पार पडणार आहे. या परिषदेत सहभागी होणार्‍या देशांच्या प्रमुखांना भारताच्या राष्ट्रपतींकडून पाठवण्यात आलेल्या रात्रीच्या जेवणाच्या इंग्रजी निमंत्रण पत्रिकेत ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिण्यात आले आहे. वास्तविक आतापर्यंत ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ असे लिहिण्यात येत होते; मात्र प्रथमच ‘इंडिया’च्या ठिकाणी ‘भारत’ असे लिहिण्यात आले आहे. या संदर्भात काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करून माहिती देत यावर टीका केली आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश

जयराम रमेश म्हणाले की, राज्यघटनेच्या कलम १ नुसार, ‘इंडिया’ला ‘भारत’ म्हटले जाते. ते राज्यांचे संघराज्य असेल; पण आता राज्यांच्या या संघराज्यावरही आघात होत आहे. (राज्यघटनेत आतापर्यंत १०० हून अधिक पालट झाले आहेत. आता सरकारने हाही पालट करावा, असेच राष्ट्राभिमान्यांना वाटते ! – संपादक)

‘रिपब्लिक ऑफ भारत !’ – आसामच्या मुख्यमंत्र्यांचे ट्वीट

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

जयराम रमेश यांच्या ट्वीट नंतर काही मिनिटांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एक ट्वीट केले. त्यात त्यांनी लिहिले, ‘रिपब्लिक ऑफ भारत. आनंद आणि अभिमान अनुभवत आहे. आपली संस्कृती ‘अमृत काल’च्या (भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने याला ‘अमृत काल’ म्हटले जाते.) दिशेने वेगाने पुढे जात आहे.’

संपादकीय भूमिका

‘इंडिया’ हे नाव इंग्रजांनी दिलेले असल्याने ते गुलामगिरीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यानंतर ते पालटून भारताचे अधिकृत एकच, म्हणजे ‘भारत’ असे नाव घोषित करणे अपेक्षित होते. आता जर सरकार यात पालट करून ‘भारत’ असे नाव ठेवणार असेल, तर इंग्रजधार्जिण्या काँग्रेसला मिरच्या झोंबणारच !