भारताने गेल्या ६ वर्षांत ८० देशांना १६ सहस्र कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांची केली विक्री !

नवी देहली – एक दशकापूर्वी जगात संरक्षण उपकरणे आणि शस्त्रास्त्र आयात करण्यात आघाडीच्या ३ आयातदार देशांपैकी भारत एक झाला होता. गेल्या ६ वर्षांत संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताचे चित्र पालटले आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये भारताने १६ सहस्र कोटी रुपयांचे स्वदेशी शस्त्रास्त्रे आणि सुटे भाग ८० देशांना निर्यात केले. केंद्रशासनाने वर्ष २०२५ पर्यंत १४ सहस्र कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. ५ वर्षांत ३५ सहस्र कोटी रुपयांच्या निर्यातीची सिद्धता केली आहे.

१. संरक्षणातील स्वदेशीकरणाला वर्ष २०१६ मध्ये प्रारंभ झाला. इतर देशांशी संरक्षण करारामध्ये पहिली अट देशी आस्थापनासमवेत संयुक्त प्रकल्पाची आहे. ‘५६ सी-२९५ एम्.डब्ल्यू.’ ट्रान्सपोर्ट विमानासाठी एअरबसशी करार केला. ३ वर्षांत १६ विमाने स्पेनहून भारतात येतील. उर्वरित ४० वडोदरातील एअरोस्पेस कॉम्प्लेक्समध्ये बनवण्यात येतील.

२. गेल्या आठवड्यात ५ दिवसांच्या भारत भेटीवर आलेले ब्राझिलच्या सैन्याचे कमांडर जनरल टॉमस मिगुएल माइन रिबेरो पाइवा यांनी ‘मेड इन इंडिया’ शस्त्रास्त्रांत रस दाखवला आहे.

३. केनियाचे संरक्षणमंत्री अडेन ब्रेर डुआले हेदेखील भारताशी लढाऊ नौका आणि लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करू इच्छितात.