महाराष्ट्रात कार्यान्वित न झालेले ४५ ‘ट्रॉमा केअर सेंटर’ तातडीने चालू करा !

‘सुराज्य अभियाना’कडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

मुंबई – रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांना त्वरित उपचार मिळावेत, यासाठी राज्यात अनेक ठिकाणी ‘ट्रॉमा केअर सेंटर’ (‘ट्रॉमा केअर सेंटर’ म्हणजे अपघातग्रस्तांची काळजी घेणारा विभाग) चालू करण्यात आले आहेत; मात्र वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये झालेल्या ६० सहस्र रस्ते अपघातांत २७ सहस्र जणांचा मृत्यू झालेला आहे.

ही संख्या प्रतीवर्षी वाढतच आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात एकूण १०८ ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू करण्याची संमती मिळाली असतांना त्यांपैकी केवळ ६३ केंद्रेच कार्यान्वित आहेत, तर ४५ ‘ट्रॉमा केअर सेंटर्स’ कार्यान्वितच नाहीत, अशी माहिती ‘माहिती अधिकारा’तून उघड झाली आहे. ‘गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते’, असा अनुभव आहे. या दृष्टीने भाविकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. ‘अपघातात प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना तातडीने उपाचार मिळायला हवेत, यासाठी शासनाने अद्याप कार्यान्वित न झालेले उर्वरित ४५ ‘ट्रॉमा केअर सेंटर्स’ त्वरित चालू करावेत’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती ‘सुराज्य अभियाना’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिली.

१. ‘सुराज्य अभियान’च्या वतीने केलेल्या माहितीच्या अधिकारात पालघर जिल्ह्यात एकही ‘ट्रॉमा केअर सेंटर’ कार्यान्वित नाही, तर सांगली जिल्ह्यात महामार्गाच्या जवळ असणार्‍या ईश्‍वरपूरमध्ये १ केंद्र चालू करण्याची संमती मिळाली आहे; पण त्याची प्राथमिक स्तरावरील प्रक्रिया चालू झालेली नाही.

२. मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि औद्योगिक केंद्र असणार्‍या माणगावातही ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू झालेले नाही.

३. पुणे-बेंगळुरू महामार्गावरील सातार्‍यातील खंडाळा येथेही अशीच स्थिती आहे.

संपादकीय भूमिका

अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यात होणारे मृत्यू पहाता सरकारने यात लक्ष घालावे, ही अपेक्षा !