फातर्पा येथे शिक्षकाकडून, तर गोवा विद्यापिठातील प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग

गोव्यात लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटना

पणजी – मडकई परिसरातील एका विद्यालयात शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतांनाच आता फातर्पा येथील एका शाळेत एका ‘पीई’ (शारीरिक शिक्षण) शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. गोवा विद्यापिठातही विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. सांज-जुझे-द-आरिएल येथे एका महिलेचा विनयभंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयिताला स्थानिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले, तसेच म्हार्दाेळ पोलीस ठाण्यात गेल्या १४ दिवसांत बलात्कारासंबंधी २ अल्पवयीन मुलींनी, तर एका अल्पवयीन मुलीने विनयभंगाची तक्रार नोंदवली आहे. राज्यातील या वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी राज्यात ‘रेड लाईट’ विभागाची (वेश्याव्यवसायाचे ठिकाण) आवश्यकता असल्याचा अजब सल्ला दिला आहे. (‘अकलेचे तारे तोडणे’ म्हणतात ते यालाच ! अशा उपाययोजना काढल्यास राज्यात अराजक माजायला वेळ लागणार नाही ! – संपादक)

सौजन्य गोवा ३६५ टीव्ही 

फातर्पा येथे ‘पीई’ शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

मडगाव – फातर्पा येथील एका शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली कुंक्कळी पोलिसांनी शाळेतील ‘पीई’ शिक्षकाला कह्यात घेतले. पीडित विद्यार्थिनीने ३० ऑगस्टला तक्रार प्रविष्ट केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. विनयभंगाची ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. संबंधित शिक्षकाने तिच्या भ्रमणभाषवर अश्लील चलचित्रे पाठवली होती. शिक्षकाला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चा चालू झाल्यानंतर पालकांनी शाळेच्या आवारात गर्दी करून कह्यात घेतलेल्या शिक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली.

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया म्हणाले, ‘‘संबंधित शिक्षकाला ‘पॉक्सो’ आणि ‘बाल (संरक्षण) कायदा यांखाली कह्यात घेतले आहे. या शिक्षकावर खात्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी, यासाठी शिक्षण खात्यालाही कळवण्यात आले आहे.’’

प्राप्त माहितीनुसार संबंधित शिक्षकाने यापूर्वी मळकर्णे येथील शाळेत शिकवतांना त्याच्या सहकारी शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार केले होते, तसेच त्याने आंबावली येथील एका शाळेत शिकवत असतांना विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये तक्रार प्रविष्ट न झाल्याने संबंधित शिक्षकावर कोणतीही कारवाई झाली नाही; मात्र या घटनेनंतर त्याचे मळकर्णे येथील शाळेत स्थानांतर करण्यात आले. (‘स्थानांतर ही शिक्षा नव्हे’, असे ‘सनातन प्रभात’ का सांगते ? त्याचे हे आहे उदाहरण ! स्थानांतर केले की, गुन्हेगार तेच कृत्य स्थानांतर झालेल्या ठिकाणी जाऊन करतो. त्यामुळे अशांवर कठोर कारवाईच हवी ! – संपादक)

गोवा विद्यापिठात विनयभंगाची तक्रार

पणजी – गोवा विद्यापिठातील वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थिनीला कार्यालयात बोलावून तिचा विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी साहाय्यक प्राधापकाच्या विरोधात महिला पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी संशयित साहाय्यक प्राध्यापकाला पोलीस ठाण्यात अन्वेषणासाठी बोलावले आहे. या घटनेविषयी संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी विद्यापिठाच्या निबंधकांकडे तक्रार नोंदवली होती; मात्र विद्यापिठाकडून काहीच कारवाई झाली नाही.

सांज-जुझे-द-आरिएल येथे महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणार्‍याला स्थानिकांनी दिला चोप

सांज-जुझे-द-आरिएल येथे एक २५ वर्षीय महिला कामावरून घरी येत असतांना एका संशयिताने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्याने संशयिताने तिला अज्ञातस्थळी नेले; मात्र महिलेचा आवाज ऐकून स्थानिक घटनास्थळी पोचले. नागरिकांनी संशयिताला बराच चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी सांज-जुझे-द-आरिएल येथे पोलीस चौकी चालू करण्याची मागणी केली आहे.

 

  • गेल्या ७५ वर्षांत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अजूनही अभ्यासक्रमात ‘साधना’ हा विषय शिकवून पुढील पिढ्यांत नैतिकता रुजवता येईल !
  • शिक्षक आणि प्राध्यापक यांच्याकडून होणारे विनयभंगाचे प्रकार पहाता, सध्याचे शिक्षण व्यक्तीला नैतिकता शिकवत नसल्याचे स्पष्ट होते !