|
रत्नागिरी, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – येथील अलिमिया महंमद सोलकर (वय ७४ वर्षे) याने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी पॉक्सो न्यायालयाकडून आरोपी अलिमिया सोलकर याला १ वर्षाचा कारावास आणि ४ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
२८ फेब्रुवारी २०२१ या दिवशी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील जामा मशिदीत घडली होती. या दिवशी अल्पवयीन मुलगी (पीडिता) नेहमीप्रमाणे मशिदीमधून कुराण शिकून बाहेर पडत असतांना अलिमियाने पीडितेचा हात धरून तिचा लैंगिक छळ केला. रत्नागिरी पोलीस ठाण्याच्या वतीने भा.दं.वि. कलम ३५४ (अ) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ प्रमाणे आरोपीवर दोषारोप ठेवण्यात आले. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्त्या (सौ.) मेघना सुहास नलावडे यांनी एकूण ७ साक्षीदार तपासले. पुरावा आणि सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी शिक्षा सुनावली.