भारतापासून रक्षण होण्यासाठी  चीन अक्साई चीनमध्ये बनवत आहे बोगदे !

उपग्रहांनी काढलेले छायाचित्र (सौजन्य : MAXAR)

नवी देहली – ‘अक्साई चीन’ मधील नदीच्या खोर्‍याच्या काठावर एका टेकडीवर  चीन बोगदे बांधत असल्याचे उपग्रहांनी काढलेल्या छायाचित्रांतून समोर आले आहे. याचा वापर चिनी सैनिकांची नियुक्ती आणि त्यांचा शस्त्रसाठा ठेवणे, यांसाठी केला जाणार आहे. भारताने आक्रमण केल्यास रक्षण होण्यासाठी चीन प्रयत्न करत आहे, असे संरक्षण तज्ञांकडून सांगितले जात आहे.

१. भू-गुप्तचर तज्ञांनी सांगितले की, नदीच्या दोन्ही बाजूला असे ११ बोगदे उपग्रहांनी काढलेल्या छायाचित्रांत दिसत आहेत. येथे छावण्या बांधल्या जात आहेत. गेल्या काही मासांमध्ये या ठिकाणी वेगाने बांधकाम चालू आहे.

२. येथील दरीच्या मध्यभागी असलेल्या रस्त्याचेही रुंदीकरण करण्यात आले आहे. थेट होणार्‍या आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी छावण्यांच्या आजूबाजूला माती टाकण्यात आल्याचेही छायाचित्रांमध्ये दिसून आले आहे. प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी विशिष्ट रचना करण्यात आली आहे, ज्यामुळे बाँबस्फोटाचा प्रभाव न्यून होईल.

३. ‘न्यूस्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर जोशी म्हणाले की, टेकड्यांमध्ये बांधकाम वाढवण्याचा चीनचा निर्णय भारताच्या वाढत्या क्षमतेशी जोडलेला आहे. अशा परिस्थितीत भारताकडून धोका अल्प करण्यासाठी चीन छावण्या उभारणे, बोगदे बांधणे आणि रस्ते रुंदीकरण यांचे काम करत आहे. भारताकडून हवाई आक्रमण किंवा सैनिकी कारवाई झाल्यास सिद्ध रहाण्याची सिद्धता चीन करत आहे.

संपादकीय भूमिका

  • अक्साई चीन भारताचा भाग असून चीनने त्याच्यावर नियंत्रण मिळवले आहे. अक्साई चीन पुन्हा भारतात समाविष्ट करण्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत !
  • भारत चीनवर स्वतःहून कधीही आक्रमण करणार नाही, हे जगजाहीर आहे. त्यामुळे चीन रक्षण होण्यासाठी नाही, तर भारतावर आक्रमण करण्यासाठी बोगदे बांधत आहे, हेच लक्षात येते !