देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ! – शिकागो विश्‍वविद्यालयाचा अहवाल

प्रदूषणामुळे देहलीतील नागरिकांच्या आयुर्मानात होत आहे ११ वर्षे ९ मास इतकी घट !

नवी देहली – अमेरिकेतील शिकागो विश्‍वविद्यालयाच्या ‘एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जागतिक आरोग्य संघटनेने निश्‍चित केलेल्या प्रदूषण मर्यादेचे देहलीत उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. तेथील प्रदूषणाची सध्याची पातळी कायम राहिल्यास देहलीतील १ कोटी ८० लाख नागरिकांचे सरासरी आयुर्मान ११ वर्षे ९ मास इतके अल्प होऊ शकते, तसेच राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार आयुर्मान सरासरी ८ वर्षे ५ मास इतके घटण्याचा धोका आहे.

वर्ष २०१३ ते २०२१ या कालावधीत जगातील ५९.१ टक्के प्रदूषणवाढीसाठी भारत उत्तरदायी असल्याचा दावा !

‘वर्ष २०१३ ते २०२१ या कालावधीत जगातील ५९.१ टक्के प्रदूषणवाढीसाठी भारत उत्तरदायी होता’, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारताच्या उत्तर भागातील सध्याची प्रदूषण पातळी कायम राहिल्यास ५२ कोटी १२ लाख नागरिक किंवा देशाच्या ३८.९ टक्के लोकसंख्येचे आयुर्मान जागतिक आरोग्य संघटनेच्या मर्यादेच्या तुलनेत ८ वर्षे आणि राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांच्या तुलनेत साडेचार वर्षांनी अल्प होण्याची शक्यता आहे.

देशातील ६७.४ टक्के लोक प्रदूषित भागांत रहातात !

भारताच्या लोकसंख्येपैकी ६७.४ टक्के लोक हे देशाने निश्‍चित केलेल्या राष्ट्रीय वायू गुणवत्ता मानक-४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा अधिक असलेल्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने निश्‍चित केलेल्या ५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर या मर्यादेतील आयुर्मानाच्या तुलनेत भारतातील हवेतील सूक्ष्म कणांचे प्रदूषण (पी.एम्. – पार्टिक्युलेट मॅटर २.५) भारतियांचे सरासरी आयुर्मान ५ वर्षे ३ मास इतके घटवते.

भारतातील सरासरी वार्षिक सूक्ष्म कणांचे प्रदूषण वर्ष १९९८ ते २०२१ पर्यंत ६७.७ टक्क्यांनी वाढले. त्यामुळे सरासरी आयुर्मान २ वर्षे ३ मास इतके घटले.

सर्वांत अल्प प्रदूषण असलेल्या पठाणकोटमध्येही आता वाढत आहे प्रदूषण !

पंजाबमधील पठाणकोट या सर्वांत अल्प प्रदूषित जिल्ह्यातही जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा सूक्ष्म कणांचे प्रदूषण ७ पटींनी अधिक आहे. सध्याचा हाच स्तर येथे कायम राहिल्यास तेथील नागरिकांचेही आयुर्मान ३ वर्षे १ मास इतके घटू शकते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

प्रदूषणाची समस्या ही जागतिक आहे. विकसित देशांमध्येही प्रदूषण असले, तरी ते त्यावर कठोर उपाययोजना करत आहेत. भारतानेही या समस्येवर मात करण्यासाठी कठोर होण्याची आवश्यकता आहे !