चीनच्या खालावत चाललेल्या अर्थव्यवस्थेला शी जिनपिंग यांची फसलेली धोरणे कारणीभूत !

जागतिक स्तरावरील अर्थतज्ञांचे मत

बीजिंग (चीन) – चीन अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला येईल, असे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र चीन मोठ्या आर्थिक मंदीच्या संकटात सापडेल कि काय ?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर मंदी आली, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला अनेक वर्षे लागतील, असे अनेक अर्थतज्ञांना वाटते. भूमी खरेदी-विक्री, बांधकाम, शिक्षण आदी क्षेत्रांत चीनमध्ये मोठी घसरण पहायला मिळत आहे. गेल्या ४० वर्षांत आर्थिक क्षेत्रात भरारी घेतलेल्या चीनच्या या परिस्थितीला कारणीभूत असलेल्या सूत्रांचा अभ्यास केला असता अर्थतज्ञांचे म्हणणे आहे की, या सर्वांमागे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची फसलेली धोरणे आहेत.

१. गेल्या काही काळात ग्राहकांकडून होणारा खर्च, गुंतवणूक आणि निर्यात या क्षेत्रांत घट झाली आहे. यावर्षी दुसर्‍या तिमाहीमध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा ३.२ टक्के, तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर हा ६ टक्के रहाण्याचा अंदाज आहे.

२. अमेरिकेविरुद्ध बराच काळ व्यापारी युद्धात गुंतल्याचे दूरगामी परिणामही आता चीनमध्ये दिसत आहेत.

३. ‘द इकॉनॉमिस्ट’च्या अहवालानुसार चीनवर ओढवलेल्या या परिस्थितीसाठी राष्ट्रपती शी जिनपिंग हेच सर्वाधिक उत्तरदायी आहेत. त्यांचे विस्तारवादी धोरण, तसेच छोट्या आणि गरीब देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढण्याच्या धोरणामुळेही चीनची अर्थव्यवस्था खालावत चालली आहे. जिनपिंग यांच्याच्या कार्यकाळात झालेल्या सत्तेच्या केंद्रीकरणामुळेही परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे देशाची परिस्थिती ते जगापासून लपवत आहेत. नुकत्याच झालेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेच्या वेळी ते महत्त्वाच्या बैठकांपासून दूर रहातांना दिसत होते.

चीनची दुर्दशा आकडेवारीत !

  • देशातील १६ टक्के बांधकाम व्यावसायिकांवर सकल देशांतर्गत उत्पादनाच्या तब्बल १६ टक्के एवढे कर्ज !
  • वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीमध्ये परकीय गुंतवणुकीत ८७ टक्क्यांची घट !
  • गेल्या काही मासांमध्ये लाखो कोटी रुपयांचे परकीय चलन गेले देशाबाहेर !