भारताला महासत्ता नव्हे, तर विश्वगुरु व्हायचे आहे ! – सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे

रत्नागिरी, २४ ऑगस्ट (वार्ता.) – घरात शिवाजी जन्माला यावा, असे म्हटले जाते; परंतु त्यापूर्वी जिजाबाई जन्माला यावी लागते. जिजाबाईंनी शिवरायांना लहानपणापासून श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या गोष्टी शिकवल्या. त्यामुळे श्रीराम आणि श्रीकृष्ण कधी अवलंबायचे ? हे कळणारा एकमेव राजा शिवछत्रपती म्हणावे लागतील. ते राजकारण धुरंधर होते. शहाजीराजांनीही मोगलांकडे चाकरी करत असूनही हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले होते. हे सर्व आम्ही विसरलो आहोत. त्यामुळे मोगल आणि इंग्रजांचे आक्रमण झाले. शिवछत्रपतींच्या जन्मासाठी मराठी जनतेला ४५० वर्षे वाट पहावी लागली. त्यानंतर आजही आपण पुन्हा शिवराय जन्म घेतील, याची वाट पहात आहोत.

भारत विश्वगुरु होण्याकरता आपल्याला आपला वैभवशाली जुना इतिहास जाणून घेतला पाहिजे. हिंदु धर्म विराट आहे. त्यामुळेच या धर्मातच अनेक योद्धे, साहित्यिक, दानशूर, स्वातंत्र्यसैनिक यांसह अष्टपैलू व्यक्तीमत्त्व जन्माला आली. मनाची ‘मॅनेजमेंट’ करणारे मनाचे श्लोक समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिले. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आपण विसरलो. उद्याचा भारत घडवायचा असेल, तर संस्कृती जतन केली पाहिजे. भारताला महासत्ता नव्हे, तर विश्वगुरु व्हायचे आहे, असे प्रतिपादन अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी केले.

चतुरंग आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्यााचे पूर्वरंग’ या अंतर्गत ‘भारत – काल, आज आणि उद्या’ याविषयावर ते बोलत होते. प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष अधिवक्ता दीपक पटवर्धन यांनी शरद पोंक्षे यांचा सत्कार केला.

श्री. शरद पोंक्षे पुढे म्हणाले की,


१. नालंदा विश्वविद्यापिठावर खिलजीने आक्रमण केले. त्या वेळी तो आजारी पडला. तेव्हा हिंदुंच्या आयुर्वेद पद्धतीने उपचार घेणार नाही, असे सांगितले. मग विश्वविद्यापिठातल्या आयुर्वेदाच्या अभ्यासू शिक्षकांनी कुराण वाचायला सांगितले. शिक्षकांनी कुराणाच्या पानांवर आयुर्वेदिक औषध लावले. कुराण वाचतांना ते बोटाला लागून खिलजीच्या पोटात गेले आणि खिलजी बरा झाला. ही गोष्ट त्याला कळल्यानंतर खिलजीने विश्वविद्यापीठ पेटवून दिले. तेथील पुस्तके, भूर्जपत्रे सहा मास जळत होती.

२. मोगलांनी भारतात मोठे वाडे, इमारती उभ्या केल्या. त्यांनी त्यांच्या देशात का उभ्या केल्या नाहीत ? आपण असे प्रश्न विचारले पाहिजेत. भारतात बांधलेल्या इमारतींचे कारागिर भारतीयच होते.

३. हिंदु धर्मात १०० टक्के नास्तिक होण्याची अनुमती आहे, यापेक्षा आणखी कोणती सवलत असली पाहिजे. अन्य धर्मात अशी पद्धत नाही.

४. ब्रिटिशांना भारतावर राज्य करतांना शेळपट, गुलाम सिद्ध करायचे होते. तशी शिक्षण पद्धती मेकॉलेने काढली. संस्कृत भाषा हद्दपार केली. आपण वेद वाचायचे बंद केले. हिंदु असण्याचा अभिमान आपल्याला वाटत नाही.