चीनच्या आर्थिक मंदीचा संपूर्ण जगाला बसणार फटका !

बीजिंग (चीन) – ‘जगाचा कारखाना’ आणि ‘उत्पादनाचे जागतिक केंद्र’ म्हणून ओळख असलेली जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणजेच चीन. जागतिक स्तरावर अनेक गोष्टींचे उत्पादन करून सर्वाधिक निर्यात करणारा हा देश अनेक गोष्टींचा सर्वांत मोठा आयातकर्ताही आहे. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाल्याने आर्थिक मंदीच्या चीनवरील टांगत्या तलवारीचा परिणाम संपूर्ण जगावरच होणार आहे, असे म्हटले जात आहे. जगातील दुसर्‍या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेच्या या चिंताजनक स्थितीमुळे जागतिक स्तरावर मंदीची लाट येईल कि काय, अशी भीतीही वर्तवण्यात आली आहे.

वर्ष २००८-०९ आणि नंतर वर्ष २०१५ मध्ये जेव्हा चीनवर आर्थिक संकट कोसळले होते, तेव्हा चीन सरकारने पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक, तसेच संपत्ती बाजाराला प्रोत्साहन दिल्याने त्याला संकटावर मात करता आली होती.

या वेळी मात्र चीनने यावर प्रयत्न केल्यावरही त्याच्या हाती अपयशच लागले आहे. कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांमुळे होरपळून निघालेले जे देश चिनी व्यापारावर अवलंबून आहेत, त्यांना याचा अधिक फटका बसणार आहे.