डिसेंबर मासात नौसेना दिवसानिमित्त होणार्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक
मुंबई – भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून या वर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ल्यावर आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात साजरा व्हावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र नौसेना क्षेत्राचे ध्वज अधिकारी रिअर एड्मिरल ए.एन्. प्रमोद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आदी उपस्थित होते.
भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा ‘नौसेना दिवस’ (४ डिसेंबर ) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश मुख्यमंत्री… pic.twitter.com/YYnQmlIHuR
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 22, 2023
आतापर्यंत नौसेना दिवस नवी देहली आणि मुंबई येथे साजरा होत असे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस आणि त्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार भारतीय नौदलाच्या वतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.
(सौजन्य : ABP MAJHA)
या वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्याचे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व पुष्कळ मोठे आहे. त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे एक संधी आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील रस्ते चांगले करा. मालवण जेट्टीसह विविध सुविधा वेळेत उभारण्यात याव्यात. पर्यावरण विभागाशी निगडित अनुमती, तसेच आवश्यक गोष्टी यांसाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. पंतप्रधान, तसेच विविध मान्यवर या नौसेना दिवसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहाणार असल्याने आवश्यक गोष्टींचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी दिल्या.
या कार्यक्रमात नौदलाच्या विविध युद्ध नौका, लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. तारकर्ली आणि मालवण समुद्रकिनारी या निमित्ताने विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती नौदलाने दिली. किल्ल्यावर उभारण्यात येणारा शिवछत्रपतींचा पुतळा, कार्यक्रमासाठी आवश्यक भूमी, रोषणाई-आतषबाजी यांच्या अनुषंगाने आवश्यक अनुमती यांचा आढावा घेण्यात आला. भारतीय पुरातत्व खात्याची अनुमती आणि अन्य नियोजन यांकरता नवी देहलीत मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत येत्या २५ ऑगस्टला विशेष बैठक होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
बैठकीत सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ येथे ‘नाईट लॅन्डींग’ (रात्रीच्या वेळी विमाने उतरवण्याची सुविधा) सुविधा चालू करण्याचे आणि हेलिपॅड सुविधा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली.