‘रात्रीचा अंधःकार दूर करणारा, चराचर सृष्टीला प्रकाशाने उजळवणारा, नवी आशा, नवी उमेद देऊन केवळ आगमनानेच सर्वांमध्येच नवचेतना जागवणारा सूर्याेदय ! सकाळच्या प्रसन्न वातावरणात मन प्रफुल्लित होते. मारुतिरायालाही ज्याने मोहित केले, त्या उगवत्या सूर्यबिंबाचे दर्शन घेणे, सूर्याेदयाच्या वेळचे ते वातावरण अनुभवणे, ही एक निराळी अनुभूती असते ! केवळ अस्तित्वाने सारी सृष्टी प्रकाशमय करणार्या सूर्यनारायणाचे दर्शन साक्षात् श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाही आकर्षित करते.
१. प्रतिदिन सूर्यदर्शन घेऊन त्या वेळच्या नैसर्गिक सौंदर्याची विविध वैशिष्ट्ये टिपणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘प्रतिदिन सूर्याेदयाच्या वेळी वृक्षवेलींच्या आडून दिसणार्या सूर्यबिंबाचे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव दर्शन घेतात. ते प्रतिदिन सूर्याेदयाच्या वेळची निरनिराळी क्षणचित्रे टिपून समवेतच्या साधकांना सांगतात. सूर्याेदयाच्या त्या सुंदर दृश्याला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव ‘रामनाथी सूर्याेदय’ असे म्हणतात. उगवत्या सूर्याची आकाशात पसरलेली केशरी छटा, झाडांमागून दिसणारे लालसर सूर्यबिंब, सूर्याेदय झाल्यानंतर वातावरणातील धुके अल्प होऊन प्रकाश सर्वत्र पसरतो, तेव्हा ते प्रकाशकिरणही छान दिसतात. या सर्वांचे गुरुदेव प्रतिदिन निरीक्षण करतात.
काही वेळा सूर्याेदय होतांना झाडांच्या पानांच्या जाळीतून सूर्यबिंब डोकावत असते. जाळीतून आल्यामुळे काही वेळा असे दृश्य दिसते की, जणू २ सूर्य उगवले आहेत कि काय, असे वाटते ! त्या २ सूर्यांचे किरणही दिसतात. तेही इतके सुंदर, एकसमान दिसतात की, जणू एखाद्या चित्रकाराने सुंदर कल्पनाचित्रच काढले आहे ! (छायाचित्र क्रमांक १) काही वेळा हाच सूर्याेदय वेगळ्या दिशेने पाहिल्यास बाजूबाजूच्या २ झाडांच्या फाद्यांच्या मधून सूर्यबिंब दिसते. त्या एकामेकांशी जुळलेल्या फांद्या गुरुदेवांना मंदिराच्या कमानीप्रमाणे वाटतात ! ‘जणू त्या मंदिरात सूर्याेदय होत आहे’, असेच ते दृश्य दिसते ! (छायाचित्र क्रमांक २)
सूर्यनारायणही प्रकाशकिरणांच्या निरनिराळ्या लीला करून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या भेटीला त्यांच्या कक्षात येतात. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि सूर्यनारायण एकमेकांचे दर्शन घेण्यासाठी आतुर असतात’, असेच आम्हाला प्रतिदिन जाणवते.’
२. सूर्याेदयाच्या वेळच्या सृष्टीसौंदर्याचा आनंद सर्वांना अनुभवता यावा, यासाठी त्या क्षणचित्रांची छायाचित्रे काढून घेणे
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या सौंदर्यदृष्टीमुळे सूर्याेदयाच्या वेळी त्यांना जे नैसर्गिक सौंदर्य अनुभवता आले, त्याची अनेक छायाचित्रे त्यांनी काढून घेतली. ‘ईश्वरी चैतन्याने ओतप्रोत असलेल्या सनातनच्या आश्रमाभोवतीचे वातावरणही दैवी असते. येथील निसर्गातही एक वेगळेच सौंदर्य आहे. त्या सृष्टीसौंदर्याचा जसा आपल्याला आनंद घेता येतो, तसाच तो सर्वांना घेता यावा, यासाठी त्या वातावरणाचे चित्रीकरण करून ठेवूया. छायाचित्रे काढून ती सर्वांना दाखवूया’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सांगतात. त्यामुळेच त्यांनी सलग महिनाभर सूर्याेदयाच्याच वेळच्या त्याच दृश्याची अनेक छायाचित्रे साधकांकडून काढून घेतली. त्यांनी निसर्ग दाखवत असलेल्या त्या दृश्याचा स्वतःही आनंद घेतला आणि साधकांना तो अनुभवता यावा, यासाठी तो परिश्रमपूर्वक टिपूनही ठेवला
३. कोळ्याने विणलेल्या जाळ्यावर सूर्यकिरण पडल्यानंतर त्यात सप्तरंग दिसत असल्याचे टिपून त्याची छायाचित्रे काढून घेणे
एका रात्री त्यांच्या कक्षाच्या खिडकीत कोळ्याने जाळे विणले होते. सकाळी सूर्यकिरण त्याच्यावर पडल्यावर त्या कोळ्याच्या जाळ्यांमध्ये सप्तरंग दिसत असल्याचे त्यांनी पाहिले. त्याचीही छायाचित्रे काढून घेण्यास त्यांनी सांगितले. (छायाचित्र क्रमांक ३) ‘जोपर्यंत त्याची चांगली छायाचित्रे मिळत नाहीत, तोपर्यंत खिडकीतील ते जाळे काढू नये’, असेही त्यांनी साधकांना सांगितले. ‘वास्तविक जळमटे ही वाईटच असतात’, अशी आपल्या मनाची धारणा असते. कोळ्याने जाळे केलेले दिसले की, आपण झाडू घेऊन ते काढून टाकतो; परंतु त्या अनायसेच आलेल्या जळमटांमध्येही काही सुंदर दिसत आहे, हे टिपणारे आणि त्याची छायाचित्रे काढून घेण्याइतके त्याला महत्त्व देणारे गुरुदेव एकमेव आहेत ! अशाच प्रकारे ते अखंड सृष्टीतील सौंदर्य टिपत असतात आणि त्याविषयी साधकांनाही सांगून त्यांना सृष्टीकडे पहाण्याची अनोखी दृष्टी प्रदान करतात !
४. ‘जे दिसेल, त्यातील सौंदर्य पहाणे आणि त्यातील देवत्व उलगडणे’, ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची शिकवण !
वास्तविक उच्च आध्यात्मिक स्थिती असल्याने ते दीर्घकाळ निर्गुणस्थितीत अथवा ध्यानस्थितीतच असतात. साधकांशी संवाद साधतांना थोडा वेळच ते सगुण स्थितीत येतात. तसेच गेली अनेक वर्षे ते त्यांच्या रहात्या खोलीतून बाहेरही गेलेले नाहीत; परंतु त्यांच्या कक्षाच्या खिडकीतून जेवढा निसर्ग दिसतो, तेवढ्या भागाचेही निरीक्षण करून ते साधकांना त्यातील अनेक बारकावे लक्षात आणून देतात. त्यांचे पहाणेही केवळ डोळ्यांनी दिसते; म्हणून पाहिले, अशा स्वरूपाचे नसते. जिज्ञासूवृत्तीमुळे त्यांना विविध प्रश्न पडतात. झाडाची कोवळी पाने लालसर गुलाबी रंगाची दिसतात. ‘ती किती काळाने हिरवी होतात ?’, याचे त्यांनी साधकांना निरीक्षण करायला सांगितले होते ! त्यांच्या कक्षाच्या बाजूच्या डोंगरावर अनेक झाडे आहेत. त्या प्रत्येक झाडाच्या पानांच्या हिरव्या रंगात वैविध्य आहे. हिरव्या रंगाच्याच अनेक छटा पहायला मिळतात. ते पाहून ‘भगवंताने किती सुंदर सृष्टी निर्माण केली आहे’, असे ते म्हणतात. त्यांच्या सहवासात ‘जे दिसेल, त्यातील सौंदर्य पहाणे आणि त्यातील देवत्व उगलडणे’, हे सहजच अंगवळणी पडते.
भगवंत सर्वव्यापी असतो. चराचर जीवसृष्टीवर, सजीव-निर्जीव सर्वांवर त्याचा कृपाकटाक्ष असतो. सर्वत्रच्या चांगल्या-वाईट पालटांची तो दखल घेतो, हे श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सहवासात आम्हाला अनेकदा अनुभवायला मिळते. चराचर सृष्टीतील सौंदर्य अनुभवण्यास शिकवून साधकांचे जीवनही सुंदर करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’
– श्री. अतुल बधाले आणि श्री. अमित डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |