अखंड भारत संकल्प दिनानिमित्त रत्नागिरीत भव्य मशाल फेरी

अखंड भारत संकल्प दिन !

भाषण करतांना श्री. अभय जगताप, सहसंयोजक, शिवशंभू विचारमंच कोकण प्रांत

रत्नागिरी, २० ऑगस्ट (वार्ता.) – अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शहरात सकल हिंदु समाजाच्या वतीने स्वातंत्र्यलक्ष्मी चौक ते जयेश मंगल पार्क अशी भव्य मशाल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये ३५० हून अधिक वाहने भगव्या ध्वजांसह सहभागी झाली होती. मशाल फेरी नंतर शिवशंभू विचारमंच कोकण प्रांताचे सहसंयोजक श्री. अभय जगताप यांचे जयेश मंगल पार्क येथे व्याख्यान झाले.

भव्य मशाल फेरी

मशाल फेरीच्या प्रारंभी स्वातंत्र्य लक्ष्मी चौक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला सर्वश्री अभय जगताप, शुभम् जोशी आणि ययाती शिवलकर यांनी पुष्पहार अर्पण केला. श्री. केशव भट यांनी श्रीफळ वाढवले. यानंतर श्री. अभय जगताप यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. यानंतर मशाल फेरीला प्रारंभ झाला.

जयेश मंगल पार्कच्या सभागृहात व्याख्यानाच्या प्रारंभी सर्वश्री अभय जगताप, डॉ. महेंद्र पाध्ये आणि अभय दळी यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. सौ. श्रुती काटे यांनी म्हटलेल्या ‘वन्दे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चंद्रकांत राऊळ यांनी केले. या कार्यक्रमाला सर्वश्री प्रशांत कदम, ओंकार रहाटे, संजय जोशी, रवींद्र भुवड, संतोष पावरी, राजेश सावंत, बाळ माने आदींसह ३०० हून अधिक जण उपस्थित होते.

अखंड भारताच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवरायांच्या विचारांचे अनुकरण आवश्यक ! – अभय जगताप, शिवशंभू विचारमंच कोकण प्रांत

श्री. अभय जगताप म्हणाले की, आपल्याला एक समर्थ भारत घडवायचा आहे, त्यासाठी अखंड भारत आम्हाला निर्माण करायचा आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. ज्या वेळी आम्ही समर्थ म्हणून स्वाभाविकरित्या अखंड बनू. अखंड बनलो, तर समर्थ बनू. विष्णु पुराणात भारतभूचा उल्लेख आहे. आताचा पाकिस्तान, बांगलादेश,  अफगाणिस्तान, तुर्कस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, तिबेट, भूतान आदी मिळून अखंड भारत पूर्वी अस्तित्वात होता. अखंड भारत पुन्हा निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरूनच आपल्याला पुढे जावे लागेल. छत्रपती शिवरायांचे गुण आत्मसात करून सारे भेद विसरून सकल हिंदु समाज म्हणून जेव्हा आम्ही उभे राहू तेव्हा अखंड भारत पुन्हा अस्तित्वात येऊ शकेल.