दैवी बालसत्‍संगात पू. रमेश गडकरी उपस्‍थित असतांना साधकांना आलेल्‍या अनुभूती आणि पू. काकांनी केलेले मार्गदर्शन

एकदा दैवी सत्‍संगात पू. रमेश गडकरीकाका यांची वंदनीय उपस्‍थिती होती. त्‍यांच्‍या दैवी उपस्‍थितीमुळे वातावरणात हलकेपणा होता आणि पुष्‍कळ प्रमाणात चैतन्‍य पसरले होते. त्‍या वेळी सत्‍संगातील वैशिष्‍ट्यपूर्ण प्रसंग आणि आलेल्‍या अनुभूती येथे देत आहोत.

उद्या निज श्रावण शुक्‍ल चतुर्थी (२०.८.२०२३) या दिवशी सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांचा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने हे लिखाण देत आहोत.

पू. रमेश गडकरी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

पू. रमेश गडकरी

१. दैवी सत्‍संगाची रूपरेषा सिद्ध करतांना सत्‍संग ‘श्री गणेश तत्त्वावर’ आधारित घेण्‍यास देवाने सुचवणे

मी आणि कु. प्रार्थना पाठक (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय १२ वर्षे) सत्‍संगाची रूपरेषा सिद्ध करत होतो. तेव्‍हा आम्‍हाला अकस्‍मात् ‘श्री गणेश तत्त्वावर आधारित सत्‍संग घ्‍यावा’, असा विचार आला. ‘हा विचार देवानेच दिला’, असे आम्‍हाला वाटले आणि त्‍यानुसार आम्‍ही सत्‍संगाची रूपरेषा तयार केली.  मी ‘गणेशलोक अनुभवून श्री गणपतीला मोदक भरवणे’, असा भावप्रयोग घेतला आणि कु. प्रार्थना हिने ‘चिंतामणी’ स्‍वरूपातील गणपतीची कथा सांगितली.

२. भावप्रयोग ऐकत असतांना कु. सोहम् पोत्रेकर याला आलेली अनुभूती

‘अत्तराचा दैवी सुगंध येऊन आनंद अन् चैतन्‍य यांच्‍या लहरी माझ्‍या दिशेने येत आहेत’, असे मला (सोहम्ला) जाणवले. ‘गणपति बाप्‍पाला मोदक भरवणे, ही एक मोठी सेवेची संधीच आहे’, असे मला जाणवले.

कु. अपाला औंधकर

३. भावप्रयोग ऐकतांना पू. काकांना आलेली अनुभूती

पू. गडकरीकाकांनी सांगितले, ‘‘माझे मन निर्विचार झाले. मला शांती आणि चैतन्‍य जाणवत होते. मोदक भरवतांना ‘साक्षात् देवालाच मी मोदक भरवत आहे’, असे वाटले; परंतु नंतर ‘साक्षात् गणपतीने मला मोदक दिला’, असेही दृश्‍य मला दिसले.’’

४. उपस्‍थित सर्व साधकांना पू. गडकरीकाकांमध्‍ये ‘श्री गणेशतत्त्व’ जागृत झाल्‍याचे जाणवणे

जसजसा सत्‍संग पुढे पुढे गेला, तसतसे आम्‍हा सर्व छोट्या बालकांना ‘पू. काकांच्‍या ठिकाणी साक्षात् गणपति बाप्‍पाच सत्‍संगात येऊन विराजमान झाला आहे’, असे वाटत होते. त्‍यानंतर आनंदाचे प्रमाणही पुष्‍कळ वाढले आणि वातावरणात गणेशतत्त्वाचा दिव्‍य सुगंधही येत होता. (ही धारिका टंकलेखन करतांना काही क्षण मला गणेशलोकातील दैवी गंध येऊ लागला. – कु. अपाला)

५. पू. गडकरीकाकांचा जन्‍म ‘चतुर्थी’ला झाला असल्‍याचे कळणे आणि कृतज्ञता व्‍यक्‍त होणे

कु. प्रार्थना पाठक

पू. गडकरीकाका यांच्‍या ठिकाणी गणेशतत्त्व जाणवण्‍याविषयी सत्‍संगात अनेक दैवी बालकांनी अनुभूती सांगितल्‍यावर पू. गडकरीकाका म्‍हणाले, ‘‘माझा जन्‍म चतुर्थीचाच आहे.’’ तेव्‍हा ‘पू. काकांमध्‍ये आम्‍हा सर्वांना इतक्‍या प्रमाणात श्री गणेशतत्त्व का जाणवत होते ? आणि रूपरेषा सिद्ध करतांना अकस्‍मात् श्री गणेशाच्‍या तत्त्वावर आधारित सत्‍संग घेण्‍याचा विचार देवाने का दिला ?’, याचे कारण आमच्‍या लक्षात आले. यावरून ‘देवाचे नियोजन किती दिव्‍य आणि परमानंददायी असते ! ‘सत्‍संगात कधी कोणता विषय घ्‍यावा ?’, याचे सर्व नियोजन देवच करत असतो’, याची जाणीव होऊन पू. गडकरीकाका आणि प.पू. गुरुदेवांप्रती पुष्‍कळ कृतज्ञता दाटून आली.

६. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘हे परमकृपाळू गुरुमाऊली, हे गणपति बाप्‍पा, आपल्‍याच अनंत कृपेमुळे आम्‍हाला पू. गडकरीकाकांच्‍या चैतन्‍यमय वाणीतून मार्गदर्शन मिळाले, तसेच पू. काकांच्‍या माध्‍यमातून गणेशतत्त्व ग्रहण करता आले. यासाठी आपल्‍या सुकोमल चरणी अपार कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– कु. अपाला अमित औंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १६ वर्षे), फोंडा, गोवा आणि कु. प्रार्थना महेश पाठक (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय १२ वर्षे), पुणे. (१५.३.२०२३)

सत्संगात पू. काकांनी केलेले मार्गदर्शन

पू. काका म्हणाले, “देवाची कृपा प्रत्येक दैवी बालकावर आहे. यात ‘आपण आपल्या प्रयत्नांनी काही करू शकतो’, असे नाही, तर भगवंत आणि श्री गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) यांच्या कृपेनेच आपण प्रयत्न करू शकतो. गुरूंनी आपल्याला बाहेरील छोट्याशा जगातून पुष्कळ व्यापक रूपातील अध्यात्मातील जगात आणले आहे. ‘गुरुकृपा हि केवलं शिष्य परममंगलम् !’, गुरुकृपेविना आपल्या जीवनात खरोखर काहीच शक्य नाही. (पू. काका हे सांगत असतांना त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि काही क्षणांसाठी वातावरण संपूर्णतः गुरुभक्तीमय झाले. – कु. अपाला) गुरूंप्रती कितीही कृतज्ञताभाव असला, तरीही तो अल्पच आहे. आपण सतत आपल्या गुरूंना शरण जाऊन कृतज्ञताभावात राहिले पाहिजे.”- कु. अपाला औंधकर आणि कु. प्रार्थना पाठक (१५.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक