पाक रशियाकडून कच्चे तेल आयात करणे बंद करणार !

  • कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करण्याचे तंत्रज्ञान विकसित नसल्याने घेतला निर्णय

  • भारताशी स्पर्धा करण्याचा पाकचा प्रयत्न पुरता फसला !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भुकेकंगाल पाकला आता आणखी एक धक्का बसला आहे. त्याला रशियाकडून मिळत असलेले कच्चे तेल यापुढे आयात करता येणार नाही. कच्च्या तेलाला शुद्ध करण्याच्या पाकच्या कारखान्यांना अत्यल्प प्रमाणात यश मिळाल्याने त्याला हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे त्याला पुष्कळ आर्थिक हानीही सोसावी लागली. रशिया-युक्रेन युद्धानंतर अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले. तरीही भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी केले. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे पाश्‍चात्त्य देशांनी भारतावर टीकाही केली, तरीही भारत त्याच्या भूमिकेवर ठाम राहिला. पाकनेही अशी भूमिका घेत रशियाकडून कच्चे तेल आयात करण्याचा निर्णय घेतला; मात्र ‘भारताशी स्पर्धा करण्याचा त्याचा प्रयत्न पुरता फसला’, असे यामुळे म्हटले जात आहे.

१. रशियाला राग येऊ नये, यासाठी पाकने आधी कच्च्या तेलाच्या आयातीवर स्थगिती आणली आहे. कालांतराने त्यावर कायमस्वरूपी प्रतिबंध लादण्यात येणार आहे.

२. पाक आणि रशिया यांच्यात केवळ ३ मासांपूर्वी हा करार झाला होता. तत्कालीन पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी त्याचा पुष्कळ प्रचार केला होता, जणूकाही हा पाकचा कूटनैतिक विजय असल्याचे सांगण्यात येत होते.

३. आता मात्र पाकने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याचे सर्वत्र हसे होत आहे.

४. पाकमधील तेल शुद्धीकरण करणार्‍या कारखान्यांमध्ये ६० वर्षे जुने तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्याने त्याला रशियाच्या तेलाचे शुद्धीकरण करणे अशक्य आहे. त्याच्याकडे आयात केल्या जाणार्‍या अरब देशांतील तेलच पुष्कळ परिश्रमाने शुद्ध केले जाते.

५. ‘अशात रशियाच्या तेलाचे शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला, तर अरब तेलाचे शुद्धीकरणही बंद होईल’, अशी कारखानदारांकडून भीती व्यक्त करण्यात येत होती.

संपादकीय भूमिका

  • भारताशी स्पर्धा करण्याच्या नादात पाकला स्वतःच्या पात्रतेचा विसर पडला. त्यामुळेच त्याच्यावर ही नामुष्की ओढवली आहे !
  • पाकिस्तानची निर्मिती द्वेषावर आधारित आहे. या द्वेषामुळेच या देशाचे अस्तित्व एक दिवशी संपवणार आहे. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !