भारत आणि लोकसभा मणीपूर येथील माता-भगिनींच्या समवेत आहे !

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्‍वास !

  • लोकसभेमध्ये अविश्‍वासाचा प्रस्ताव रहित!

  • काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी निलंबित !

नवी देहली – हिंसाचाराने जळत असलेल्या मणीपूरमध्ये निश्‍चितच शांतीचा सूर्य उगवेल. केंद्र आणि राज्य सरकार सर्व हिंसाचार्‍यांना कठोर शिक्षा करील. मणीपूर येथील माता-भगिनींनी लक्षात घ्यावे की, हा देश आणि हे सदन तुमच्या समवेत आहे. मी मणीपूरवासियांना आश्‍वस्त करतो की, मणीपूर पुन्हा एकदा विकासाच्या दिशेने अधिक गतीने पुढे जाईल, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० ऑगस्टच्या सायंकाळी लोकसभेत केले. मणीपूर येथील हिंसाचारावरून विरोधी पक्षांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या विरोधात अविश्‍वासाचा प्रस्ताव प्रविष्ट केला होता. यावर उत्तर देतांना पंतप्रधान मोदी बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाच्या वेळी काँग्रेससह बहुतेक विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकत ते सभागृहातून निघून गेले. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर अविश्‍वासाच्या प्रस्तावावर आवाजी मतदान घेण्यात आले. यामध्ये ‘नाही’ म्हणणार्‍यांचा आवाज अधिक असल्याने प्रस्ताव रहित झाला, असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घोषित केले. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात शिस्तभंगाचा प्रस्तावही या वेळी संमत करण्यात आला. त्यामुळे त्यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांचे अविश्‍वास प्रस्तावावरील भाषण आजपर्यंतचे सर्वांत मोठे भाषण आहे. ते तब्बल २ घंटे १४ मिनिटे बोलले.

या वेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले,

१. भारत सरकारने पूर्वोत्तर भारताच्या विकासासाठी गेल्या ९ वर्षांत लाखो कोटी रुपये खर्च केले. पूर्वोत्तर भारत हा लवकरच दक्षिण पूर्व आशियाचे केंद्र बनेल.

२. भावभक्तीने ओतप्रोत भरलेले आणि देशासाठी असंख्य बलीदान दिलेले मणीपूर राज्य  काँग्रेसच्या सत्ताकाळात फुटीरतावादाच्या आगीच्या स्वाधीन झाले होते. काँग्रेस मणीपूरच्या अशांतीची जननी आहे. तिच्या सत्ताकाळात सर्व गोष्टी फुटीरतावाद्यांच्या इच्छेनेच घडायच्या. सरकारी कार्यालयात म.गांधी यांचे चित्र लावू दिले जात नव्हते. सायंकाळी ४ नंतर मंदिरे बंद करावी लागत होती. त्यांच्या संरक्षणार्थ सैन्याला पहारा द्यावा लागत होता. काँग्रेसचे दु:ख आणि संवेदना ही ठरावीक लोकांपुरता मर्यादित राहिली आहे.

३. वर्ष २०१८ मध्येही विरोधी पक्षांनी आमच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. तो प्रस्ताव तर पडलाच; परंतु वर्ष २०१९ च्या निवडणुकांत जनतेनेही विरोधकांवरील ‘अविश्‍वास’ मतदानाद्वारे घोषित केला होता. त्यामुळे विरोधी पक्षांचा अविश्‍वासाचा ठराव आमच्यासाठी शुभ असतो.

४. काँग्रेसचे खासदार लोकसभेतून बहिष्कार टाकून जात असतांना पंतप्रधान म्हणाले, ‘विरोधी पक्ष आम्हाला सुनावतो; परंतु त्यांच्यात ऐकण्याचे धैर्य नाही ! खोटे पसरवणे, अपशब्द बोलणे आणि मग पळून जाणे, ही त्यांची जुनी रितच राहिली आहे. हा देश यांच्याकडून विशेष अपेक्षा करू शकत नाही.’

भारतमातेचे ३ तुकडे होण्यास काँग्रेस उत्तरदायी !

काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या ‘पंतप्रधानांमुळे मणीपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली’ या वक्तव्यावर पंतप्रधान म्हणाले की, ‘लोकशाहीची हत्या’, ‘राज्यघटनेची हत्या’ ही भाषा बोलणारे आता भारतमातेची हत्या झाल्याचे बरळत आहेत. वर्ष १९४७ मध्ये भारतमातेचे जे ३ तुकडे झाले, त्यास काँग्रेसच उत्तरदायी आहे. ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणार्‍यांच्या साहाय्यासाठी हेच लोक गेले होते. भारताच्या मुख्य भूमीला पूर्वोत्तर राज्यांशी जोडणारा ‘सिलीगुडी कॉरिडोर’ तोडण्यात येण्याच्या मागणीला याच काँग्रेसने समर्थन दिले होते. काँग्रेसचा इतिहास हा भारताला छिन्नविच्छिन्न करणारा राहिला आहे.