वर्ष १९८० मधील मोरादाबाद दंगलींचा अहवाल ४३ वर्षांनी उत्तरप्रदेश विधानसभेत सादर !

  • मुस्लिम लीगचे नेते दंगलीसाठी कारणीभूत असल्याचा एम्.पी. सक्सेना यांचा वर्ष १९८३ चा हा अहवाल !

  • ४० वर्षे सर्वपक्षीय सरकारांनी अहवाल दाबून ठेवला !

  • हिंदुत्वनिष्ठांनीच ही दंगल घडवल्याचे आतापर्यंत सांगत आली हिंदुद्वेष्टी काँग्रेस !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यशासनाने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये वर्ष १९८० मध्ये राज्यातील मोरादाबाद येथे झालेल्या दंगलींशी संबंधित अहवाल सादर केला. या दंगलीमध्ये ८० हून अधिक लोक मारले गेले होते, तर ११२ हून अधिक जण घायाळ झाले होते. या अहवालात मुस्लिम लीगच्या २ नेत्यांना दंगलींसाठी उत्तरदायी धरण्यात आले आहे. या अहवालात काँग्रेसने हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात रचलेले  कथानक निराधार असल्याचे सांगण्यात आले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम्.पी. सक्सेना यांनी हा अहवाल बनवून वर्ष १९८३ मध्ये तो सरकारसमोर ठेवला. ४९६ पानी असलेला हा अहवाल गेली ४ दशके विविध राज्य सरकारांनी दडपून ठेवला होता. या दंगली  ऑगस्ट ते नोव्हेंबर १९८० या कालावधीत घडल्या.

१. चौदा वेळा थातूरमातूर कारणे देत हा अहवाल विधानसभेत मांडण्यात आला नाही. यासंदर्भातील माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी दिली. मौर्य म्हणाले की, हा अहवाल लपवण्यात आला होता. या अहवालामुळे मोरादाबाद दंगलींचे सत्य जनतेसमोर येईल. या अहवालातून ‘दंगल कोण घडवते ?’, ‘त्याला कोण त्यास समर्थन देते आणि कोण त्याच्या विरोधात लढते’, हे जनतेला समजेल. आतापर्यंत १५ मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल दडपून ठेवला होता.

२. काँग्रेस आणि साम्यवादी गेली ४३ वर्षे या दंगलींसाठी रा.स्व.संघ, बजरंग दल, तत्कालीन जनसंघ आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना उत्तरदायी ठरवत आले होते.

मोरादाबाद दंगलींच्या वेळी काय झाले ?

१३ ऑगस्ट १९८० या दिवशी मोरादाबादच्या इदगाहमध्ये ७० सहस्र मुसलमान नमाजपठण करत असतांना मुस्लिम लीगच्या नेत्यांनी एका डुकराला आत सोडले. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना मुसलमानांनी कारवाई करण्यास सांगितल्यावर पोलीस शांत राहिले.

यामुळे संतापलेल्या मुसलमानांनी जवळच्या दलित झोपड्यांवर आक्रमण करून त्या लुटल्या आणि जाळपोळ केली. या हिंसाचारात एका पोलीस हवालदाराला जिवंत जाळण्यात आले, तर अतिरिक्त जिल्हाधिकारी डी.पी. सिंह यांनाही धर्मांध मुसलमानांनी मरेपर्यंत मारहाण केली. गालशाहीद पोलीस ठाण्यावर आक्रमण करून तेथील दोन पोलिसांचीही नंतर धर्मांधांनी हत्या केली. या दंगलीचे लोण राज्यातील संभल, अलीगड, बरेली, प्रयागराज आणि मोरादाबाद जिल्ह्यांतील ग्रामीण भागांत पसरले. त्या काळात काँग्रेसमध्ये असलेले विश्‍वनाथ प्रताप सिंह हे राज्यात मुख्यमंत्री, तर केंद्रात इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या.

संपादकीय भूमिका

  • देशातील बहुसंख्य हिंदूंना ‘हिंसक’ ठरवण्याची काँग्रेसची ही जुनी खोडच आहे. त्यामुळेच आज ती शेवटची घटका मोजत आहे, हे जाणा !
  • लोकशाहीचा उदोउदो करणारी काँग्रेस, समाजवादी, बहुजन समाजवादी पक्ष आदींचे सरकार उत्तरप्रदेशात येऊनही त्यांनी दंगलींमागील सत्य जनतेसमोर येऊ दिले नाही. अशा बेगडी निधर्मीवादामुळेच हे पक्ष इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत.