पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ गडहिंग्‍लज येथे मोर्चा !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ निघालेला मोर्चा

गडहिंग्‍लज (जिल्‍हा कोल्‍हापूर) – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ गडहिंग्‍लज येथे भव्‍य मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्‍याला पुष्‍पहार अर्पण करून ध्‍येय मंत्राचे उच्‍चारण करून मोर्चाचा प्रारंभ झाला. नेहरू चौक, बाजारपेठ, महात्‍मा बसवेश्‍वर पुतळा येथे पुष्‍पहार अर्पण करून बस स्‍थानकाजवळील छत्रपती शिवरायांच्‍या पुतळ्‍याला पुष्‍पहार अर्पण करून प्रांत कार्यालयासमोर मोर्चाची समाप्‍ती झाली. पू. भिडेगुरुजी यांच्‍या छायाचित्राला दुग्‍धाभिषेक अर्पण करून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्‍यात आले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ निघालेल्‍या मोर्चाच्‍या समारोपप्रसंगी जमलेले धारकरी, हिंदुत्‍वनिष्‍ठ

१. श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे गडहिंग्‍लज येथील कार्यवाह श्री. सागर कुराडे यांनी मोर्चाचा उद्देश स्‍पष्‍ट केला. श्री. अजित धुळाज यांनी पू. भिडेगुरुजी यांचे कार्य, संघटन कौशल्‍य, तसेच सध्‍याची राष्‍ट्र आणि धर्म यांची स्‍थिती यांविषयी मार्गदर्शन केले.

२. आजरा येथील भाजपचे श्री. नाथा देसाई, श्री. संदीप नाथबुवा यांच्‍यासह श्री. प्रीतम कापसे आणि श्री. अशोक शिंदे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.

३. या मार्गदर्शनानंतर पू. भिडे गुरुजींच्‍या छायाचित्राला माता-भगिनींच्‍या हस्‍ते दुग्‍धाभिषेक करण्‍यात आला.

४. प्रांताधिकार्‍यांना दिलेल्‍या निवेदनात पू. भिडेगुरुजी यांच्‍यावर बेछूट आरोप करून त्‍यांचे चारित्र्य मलीन करण्‍याचा केविलवाणा प्रयत्न करणार्‍या समाजद्रोह्यांवर कठोर कारवाई करण्‍याची मागणी करण्‍यात आली. ध्‍येयमंत्राचे सामूहिक उच्‍चारण करून मोर्चाची सांगता झाली.

५. या मोर्चात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते श्री. आप्‍पा शिवणे, सर्वश्री सुभाष चोथे, अभिजित मोटे, अशोक शिंदे, मनोज पोवार, सचिन प्रसादे, सतीश मगदूम, राजू मोरे यांसह ५०० हून अधिक धारकरी, हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते.

मोर्चा प्रांत कार्यालय येथे आल्‍यावर उपस्‍थित धारकरी, माता-भगिनी

शनिवारी तासगाव (जिल्‍हा सांगली) येथे ५ ऑगस्‍ट या दिवशी सकाळी १०.३० वाजता शिवतीर्थ येथे सहस्रो धारकर्‍यांच्‍या उपस्‍थितीत पू. भिडेगुरुजी यांच्‍या छायाचित्राला दुग्‍धाभिषेक करण्‍यात येणार आहे. यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्‍यात येणार आहे.