विधान परिषदेतून…
मुंबई, ३ ऑगस्ट (वार्ता.) – महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असून हिंदु मुलींना बळजोरीने धर्मांतर करायला भाग पाडले जात आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अनधिकृत धर्मांतर बंदीचा कायदा आणला आहे. हा कायदा धर्मांतराच्या अनधिकृत प्रक्रिया, तसेच धार्मिक परिवर्तनास प्रतिबंध करतो. उत्तर प्रदेशात एवढा स्वच्छ आणि सरळ कायदा येत असेल, तर महाराष्ट्रातही अशा प्रकारचा कायदा आणला पाहिजे, अशी आग्रहाची मागणी भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी २ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत केली. विधान परिषद नियम २६० अन्वये चर्चेला आलेल्या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रस्तावावर चर्चा करतांना ते बोलत होते.
सौजन्य टीव्ही 9 मराठी
ते म्हणाले की,…
१. हिंदु मुलींना फसवून, चुकीची माहिती देऊन, प्रलोभने दाखवून स्वतःची चुकीची नावे ठेवून आणि प्रेमाचे नाटक करून फसवले करून धर्मांतर करायला भाग पाडले जाते. हिंदु मुलींसमवेत विवाहाचे नाटक केले जाते. नंतर अत्याचार करून मुलींना सोडून दिले जाते किंवा मारून टाकले जाते.
२. कुठल्याही राज्याचा विकास आणि प्रगती ही त्या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर अवलंबून असते. तशा प्रकारची कायदा-सुव्यवस्था व्यवस्थित असेल, तर उद्योगधंद्यांनाही प्रोत्साहन मिळते.
३. अनेक ठिकाणी, तसेच शाळा आणि महाविद्यालयांजवळ नियम धाब्यावर बसवून टपरीवर अमली पदार्थ सर्रास विकले जातात. अशा टपर्या हटवण्याचे दायित्व महापालिकेचे आहे. पोलीस आणि महापालिका यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. सध्या २ सहस्र ५०० अमली पदार्थांच्या पान टपर्या उद्ध्वस्त करण्याचे काम मुंबई पोलिसांनी केले आहे. साधारणतः ४० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. उद्याच्या तरुण पिढीला नासवणार्या ज्या गोष्टी आहेत, त्यांपासून संरक्षण करण्याचे दायित्व आपले आहे. त्यामुळे पोलिसांनी आणखी काळजी घ्यावी.