श्रीमती भाग्यश्री आणेकर (वय ६६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)
१. तापामुळे पुष्कळ अशक्तपणा जाणवणे आणि मनात अचानक मृत्यूचे विचार येणे, नामजपाला बसल्यावर भयानक दृश्ये दिसणे, झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप न लागणे अन् शारीरिक त्रासामुळे असंख्य वेदना होऊन पायात गोळे येणे
‘मला तापामुळे पुष्कळ अशक्तपणा जाणवत होता. माझ्या मनात अचानक मृत्यूचे विचार येऊ लागले. मला मृत नातेवाइकांची आठवण येत होती. मी प्रयत्न करूनसुद्धा ते विचार थांबत नव्हते. मी नामजपाला बसले की, मला भयानक दृश्ये दिसत होती. झोपेच्या गोळ्या घेऊनसुद्धा मला झोप लागत नव्हती. जरा कुठे डुलकी लागते ना लागते, तोच हलकीशी खाज सुटत होती. ती खाज इतके भयानक रूप धारण करत होती की, खाजवून माझी नखे आणि हाताची बोटे वाकडी होत होती. मला नामजप आणि प्रार्थना सुचत नव्हती. ‘मी हा त्रास कुणाला
सांगू ? मी तर माझ्या मुलापासून पुष्कळच दूर आले आहे. कसले हे माझे प्रारब्ध ?’, असे विचार मनात येऊन ‘काय करावे ?’, हे मला कळत नव्हते. रात्र वैर्याची वाटत होती. ‘परत थोडी झोप लागायची आणि त्याच वेळी माझ्या पायांची नखे कुणीतरी उपटत आहे’, असे वाटायचे. मला असंख्य वेदना होत होत्या. त्याच वेळी माझ्या पायांत गोळेही येत होते.
२. प.पू. डॉक्टरांना तळमळीने साद घातल्यावर त्यांचा आवाज कानावर येणे आणि त्यांनी ‘चिंता करू नका, मी आहे’, असे सांगणे, तेव्हा ताप अल्प-अधिक होत असूनही आनंदी होणे
मी ‘परम पूज्य’ अशी हाक मारून तळमळीने त्यांना साद घालत होते. तेव्हा माझ्या शेजारी त्यांचे मोठे छायाचित्र होते. ‘मनाला त्याही अवस्थेत समाधान वाटून परम पूज्य आहेत’, असे वाटले आणि त्या क्षणी त्यांचा आवाज कानावर आला, ‘चिंता करू नका. मी आहे.’ मला त्यांचे हसरे मुख समोर दिसत होते. माझा ताप अल्प-अधिक होत होता; परंतु मी त्यातही आनंदी होते.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन अधूनमधून होणे ‘परात्पर गुरुदेव सतत समवेत आहेत’, हे अनुभवणे आणि कुटुंबियांची आठवण न्यून होऊन प्रत्येक प्रसंगात कृतज्ञता वाटणे
मला अधूनमधून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचे दर्शन होत होते. तेव्हा मला आनंद आणि प्रसन्नता वाटत होती. ‘परात्पर गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, हे मी सतत अनुभवत होते. श्रीमत् शंकराचार्य यांचेही मला अधूनमधून दर्शन होत होते. माझा घरी जाण्याचा विचार आपोआप बंद झाला. मला कुटुंबियांची आठवण येणे न्यून होऊन त्या ठिकाणी प्रत्येक प्रसंगी कृतज्ञता वाटली. सेवेसंदर्भात प्रार्थना करत असतांनाच सहसाधिकेने मला साधकांसाठी नामजप करण्याची सेवा दिली. कसे वर्णन करू त्या परात्पर गुरुमाऊलीचे ? ‘हे सगळे मला शिकण्यासाठीच देवाने केले’, असे मला वाटते. देवानेच माझ्याकडून हे सर्व करून घेतले आणि लक्षात आणून देऊन लिहून घेतले. त्याबद्दल त्याच्या चरणी कोटिशः कृतज्ञता व्यक्त करते.’
श्री. शशांक सिंह
१. औषधोपचारानंतर सुद्धा ताप ११ दिवसांपर्यंत १ अंशभरसुद्धा न्यून न होणे, ताप आल्यामुळे द्रव पदार्थांचे सेवन करणे, शरीर अशक्त होणे आणि या संपूर्ण कालावधीत कधीही निरुत्साह न वाटणे
‘१२.५.२०२१ या दिवशी मला ताप आल्यामुळे मी झोपलो होतो. तापामुळे मी द्रव (पातळ) पदार्थांचे सेवन करत होतो. औषधोपचारानंतर सुद्धा ११ दिवसांपर्यंत १ अंशभर सुद्धा ताप न्यून होत नव्हता. ताप १०० डिग्रींच्या वरच असायचा. मला अशक्तपणा आला होता. उठून बसल्यावर मला चक्कर येत होती; परंतु या संपूर्ण कालावधीत मला कधीही घाबरायला झाले नाही किंवा निरुत्साह वाटला नाही.
२. कधी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, तर कधी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ किंवा भूवैैकुंठस्वरूप रामनाथी आश्रम यांचे स्वप्नात दर्शन होऊन रामनाथी आश्रमात असल्याप्रमाणेच वाटणे अन् दुसर्या दिवशीपासून ताप उतरणार असल्याचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगणे
रात्री स्वप्नात परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मला कधी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, तर कधी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ किंवा भूवैैकुंठस्वरूप रामनाथी आश्रम, यांचे दर्शन होत असे आणि मला ‘मी आश्रमातच आहे’, असे वाटत असे. ११ व्या दिवशीही ताप न्यून झाला नाही. त्या दिवशी सायंकाळी माझ्या प्रकृतीची काळजी घेणारे सहसाधक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी निरोप दिला की, ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले आहे, ‘उद्यापासून शशांकचा ताप उतरणार आहे.’
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार दुसर्या दिवसापासून ताप न्यून होणे
त्या वेळीसुद्धा माझ्या शरिराचे तापमान १०१.३ डिग्री एवढे होते. तो निरोप ऐकून माझी भावजागृती झाली. ‘विश्वाचे पालनकर्त्या असलेल्या गुरूंच्या उत्तराधिकारी, ज्या स्वतःसुद्धा विश्वाचे पालन करणार्या आहेत, त्या माझ्यासारख्या एका सामान्य जिवाला प्रकृतीविषयी आश्वस्त करत आहेत. त्या स्वतः माझी काळजी घेत आहेत’, हे मला माझे मोठे भाग्यच वाटले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा निरोप आल्यानंतर दुसर्या दिवसापासून ताप न्यून होऊन ४ दिवसांनी तो पूर्णपणे गेला.
४. झोपेत दोन हात दिसून ते श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे विश्वरूपातील हात असल्याचे वाटणे
त्यानंतर नामजप करतांना मला झोप लागली. झोपेत मला जाणवले, ‘माझ्यावर एक विशाल हात आहे आणि तो मला चैतन्य देत आहे. खालीसुद्धा मला एक हात दिसला ज्याने मला सांभाळून ठेवले आहे.’ त्या वेळी ते दोन्ही हात मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे विश्वरूपातील हात वाटले. मी मनात दृढ निश्चय केला, ‘भविष्यात माझी श्रद्धा कधीही अल्प पडता कामा नये.’
५. साधकांच्या रूपांतून ईश्वरच काळजी घेत असल्याने कृतज्ञता वाटणे
ईश्वर स्वतः सहसाधक श्री. विश्वनाथदादा, श्री. निलयदादा आणि कु. सुमनताई यांच्या रूपात माझी काळजी घेत आहे. श्री. निलयदादा आणि कु. सुमनताई स्वतः आजारी असूनही माझी काळजी घेत होते. या अनुभूतीसाठी मी कोटीशः कृतज्ञ आहे.
सौ. प्राची मसुरकर
यजमानांना ताप आल्यावर बर्याच दिवसांपासून त्यांना जेवण जात नसल्याने त्यांची चिंता वाटणे, परात्पर गुरुदेवांनी साधकांच्या माध्यमांतून यजमानांची सर्व काळजी घेणे आणि गुरुदेवांच्या कृपेने यजमान बरे होणे
एप्रिल २०२१ मध्ये माझे यजमान श्री. दशरथ मसुरकर यांना ताप येऊ लागला. बर्याच दिवसांपासून त्यांना जेवण जात नव्हते. त्यांना कोरोनाची लक्षणे असल्याचे वाटत होते. त्यामुळे आरंभी मला थोडी चिंता वाटली; कारण त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, मूतखडा इत्यादी व्याधीसुद्धा आहेत; परंतु परात्पर गुरुदेवांनी साधकांच्या माध्यमांतून त्यांची काळजी घेतली. त्यांना रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जाणे, औषधे आणून देणे, वेळच्या वेळी औषधे देणे, त्यांना आवडतात ते पदार्थ त्यांना बनवून देणे, प्रतिदिन ताप, ऑक्सिजन आणि नाडीचे ठोके पहाणे अन् त्यांच्याकडून आध्यात्मिक उपाय करवून घेणे, या सर्व कृती गुरुदेवांनी साधकांच्या माध्यमांतून करवून घेतल्या. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ते बरे झाले. त्याबद्दल मी परात्पर गुरुदेव आणि सर्व साधक यांच्याप्रती कृतज्ञ आहे.
जया सिंह (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)
१. वडिलांची प्रकृती बरी नसल्याचे समजल्यावर ‘त्यांनी कार्यालयात जाऊ नये’, यासाठी त्यांना आग्रह करणे
माझे वडील श्री. सोनराज सिंह यांची परात्पर गुुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा आहे. काही दिवसांपूर्वी वडिलांनी कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी एक लस (वॅक्सिन) घेतली होती. त्यामुळे त्यांना ताप आला होता. त्याच वेळी निवडणूक असल्यामुळे त्यांना जिल्ह्यातून बाहेर निवडणुकांच्या ठिकाणी जावे लागत होते. वडील एका सेवेविषयी माझ्याशी भ्रमणभाषवर बोलतांना मला त्यांच्या आवाजावरून ‘त्यांची प्रकृती ठीक नाही’, असे जाणवले. त्याविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘मला ताप येत आहे; परंतु मी त्यासाठी औषधे घेतली आहेत.’’ मी त्यांच्या प्रकृतीच्या दृष्टीकोनातून ‘त्यांनी कार्यालयात जाऊ नये’, असा त्यांना आग्रह केला. मी सांगितले, ‘‘प्रकृती बरी नसतांनाही कार्यालयात जावे लागत असेल, तर अशी नोकरी सोडून द्या !’’
२. ‘कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये परात्पर गुरुदेवांविषयी विकल्प येणार नाही, अशी श्रद्धा असायला हवी’, असे वडिलांनी सांगणे आणि त्यांची परात्पर गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा पाहून मुलीचे मन सकारात्मक होणे
मी वडिलांना नोकरी सोडण्याविषयी सांगितल्यावर वडील मला म्हणाले, ‘‘जर मला काही होणार असेल, तर मी कुठेही असलो, म्हणजे घरी किंवा कार्यालयात असलो, तरी ते होणारच आहे; परंतु काहीही झाले, तरी परात्पर गुरुदेवांप्रती असलेली श्रद्धा न्यून व्हायला नको. माझा मृत्यू जरी झाला, तरी परात्पर गुरूंप्रती मनात एकसुद्धा विकल्प येणार नाही एवढी आपली श्रद्धा असायला पाहिजे. त्यामुळे चिंता करण्याऐवजी परात्पर गुरुदेवांप्रती भाव वाढवण्याचा प्रयत्न करावा. ते साधनेसाठी लाभदायक होईल.’’ त्यानंतर २ दिवसांनी वडिलांना बरे वाटू लागले.
वडिलांची दृढ श्रद्धा पाहून माझे मन सकारात्मक झाले आणि साधनेचे पुढचे प्रयत्नसुद्धा होऊ लागले. परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(सर्व सूत्रांचा दिनांक मे २०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |