संजयकुमार मिश्रा यांच्‍या ‘ईडी’च्‍या संचालकपदाचा कार्यकाळ १५ सप्‍टेंबरपर्यंत वाढवला !

संजय कुमार मिश्रा

नवी देहली – ‘ईडी’, म्‍हणजेच अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक संजयकुमार मिश्रा यांच्‍या कार्यकाळात १५ सप्‍टेंबरपर्यंत वाढ करण्‍याची अनुमती सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिली आहे. केंद्रशासनाने न्‍यायालयाकडे याविषयीची मागणी केली होती.

संजयकुमार मिश्रा यांची नोव्‍हेंबर २०१८ मध्‍ये ‘ईडी’च्‍या संचालकपदी नेमणूक करण्‍यात आली होती. २ वर्षांच्‍या निर्धारित कार्यकाळानंतर केंद्रशासनाने त्‍यांचा कार्यकाळ तीनदा वाढवला. यासंदर्भात सरकारने एक अधिसूचना जारी केली होती. या विस्‍ताराच्‍या विरोधात सर्वोच्‍च न्‍यायालयात अनेक याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आल्‍या. न्‍यायालयाने केंद्र सरकारच्‍या या निर्णयाला अवैध ठरवून मिश्रा यांना त्‍यांचे प्रलंबित कार्य ३१ जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्‍यास सांगितले होते. आता मात्र न्‍यायालयाने त्‍यांना १५ सप्‍टेंबर २०२३ पर्यंतची मुदतवाढ दिली आहे.