रांची (झारखंड) येथील गुरुपौर्णिमा महोत्‍सवाच्‍या प्रचाराच्‍या वेळी ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. शंभू गवारे यांना आलेल्‍या अनुभूती

गुरुपौर्णिमा महोत्‍सवाच्‍या प्रसाराच्‍या कालावधीमध्‍ये ‘गुरुकृपा कशी कार्य करते ?’ हे अनुभवणे

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

‘रांची, झारखंड येथे सौ. पूजा चौहान या एकच साधिका आहेत. त्‍यांनी आणि श्री. शंभू गवारे यांनी ‘रांची येथे प्रचारकार्य आरंभ होऊ शकते’, असा सकारात्‍मक विचार करून श्रद्धेने अन् उत्‍साहाने गुरुपौर्णिमा महोत्‍सवाचे आयोजन केले. प्रयत्नांच्‍या आरंभीच त्‍यांना गुरुपौर्णिमेसाठी निःशुल्‍क सभागृह मिळाले. त्‍यांनी समाजातील काही जिज्ञासू आणि धर्मपरायण लोकांना संपर्क केला असता त्‍यांच्‍याकडून सकारात्‍मक प्रतिसाद मिळाला. रांची येथील माहेश्‍वरी समाजाचे अध्‍यक्ष श्री. शिव शंकर साबू यांना कार्य आवडले आणि त्‍यांनी धर्मप्रसाराच्‍या कार्याला साहाय्‍य करण्‍याचे आश्‍वासन दिले, तसेच श्री. शंभू गवारे यांची ५ दिवस रहाण्‍याची व्‍यवस्‍थाही केली. गुरुपौर्णिमेचा प्रत्‍यक्ष प्रचार कार्यक्रमाच्‍या १ सप्‍ताहापूर्वी आरंभ होऊ शकला. मंदिराच्‍या पुजार्‍यांनी ‘प.पू. भक्‍तराज महाराज या मंदिरात अनेकदा येऊन गेले आहेत’, असे सांगून कार्यक्रमाला भरभरून आशीर्वाद दिले. यातून ‘गुरुकृपा कशी कार्य करते ?’, हे लक्षात आले.

– सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शक संत, वाराणसी, उत्तरप्रदेश. (१६.७.२०२२)

‘वर्ष २०२२ मध्‍ये रांची, झारखंड येथे प्रथमच गुरुपौर्णिमा महोत्‍सव आयोजित केला होता. तेथील स्‍थानिक साधिका सौ. पूजा चौहान आणि माझ्‍याकडे प्रसाराची सेवा होती. गुरुपौर्णिमेचा प्रसार चालू करण्‍यापूर्वी आम्‍ही श्रीराममंदिरामध्‍ये निमंत्रण पत्रिका ठेवून आशीर्वाद घेण्‍यासाठी गेलोे. त्‍या वेळी आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

श्री. शंभू गवारे

१. श्रीराम मंदिरामधील पुजार्‍यांनी गुरुपौर्णिमा महोत्‍सवाची निमंत्रण पत्रिका पाहून ‘प.पू. भक्‍तराज महाराज या मंदिरात अनेकदा येऊन गेले आहेत’, असे सांगून त्‍यांनी कार्यक्रमाला भरभरून आशीर्वाद देणे

आम्‍ही श्रीराम मंदिरामधील पुजार्‍यांना गुरुपौर्णिमा महोत्‍सवाच्‍या आयोजनाविषयी माहिती सांगितली आणि श्रीरामाच्‍या चरणी त्‍याविषयी प्रार्थना करण्‍याची विनंती केली. निमंत्रण पत्रिकेवरील प.पू. भक्‍तराज महाराज यांचे छायाचित्र पाहून पुजारी म्‍हणाले, ‘‘हे या मंदिरामध्‍ये अनेक वेळा येऊन गेले आहेत. यांना मी चांगले ओळखतो.’’ तेव्‍हा आम्‍ही त्‍यांना सांगितले, ‘‘तेे आमच्‍या गुरुदेवांचे (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) गुरु आहेत.’’ त्‍यावर पुजारी म्‍हणाले, ‘‘गुरुजींचा (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) कार्यक्रम आहे, तर पुष्‍कळ लोक येतील. माझा तुमच्‍या या कार्यक्रमाला आशीर्वाद आहे. हा कार्यक्रम अतिशय चांगला होईल.’’ त्‍यानंतर आम्‍ही त्‍यांना विचारले, ‘‘तुमच्‍या मंदिरात जे दर्शनार्थी येतील, त्‍यांना देण्‍यासाठी तुम्‍ही काही निमंत्रण पत्रिका ठेवू शकता का ?’’ त्‍यांनी लगेच काही निमंत्रण पत्रिका ठेवून घेतल्‍या. पुजार्‍यांचे बोलणे आणि प्रतिसाद ऐकून आम्‍हाला पुष्‍कळ कृतज्ञता वाटत होती.

२. गुरुपौर्णिमेच्‍या कार्यक्रमाला देवतांनी उपस्‍थित राहून उपस्‍थितांना आशीर्वाद देण्‍यासाठी प्रार्थना केल्‍यावर देवताच प्रचार करणार असल्‍याचे श्रीरामाने सांगितल्‍याचे जाणवणे

‘गुरुपौर्णिमेच्‍या वेळी देवतांनी कार्यक्रमाला सूक्ष्मातून उपस्‍थित राहून उपस्‍थितांना आशीर्वाद द्यावेत’, यासाठी आमच्‍याकडून प्रार्थना होत होती. तेव्‍हा ‘प्रभु श्रीरामाने गुरुपौर्णिमा महोत्‍सवासाठी आशीर्वाद दिला आणि त्‍याचा प्रचार देवताच करणार आहेत’, असे त्‍याने आम्‍हाला सांगितल्‍याचे जाणवले. गुरुपौर्णिमेच्‍या आयोजनाला आशीर्वाद देण्‍यासाठी प.पू. भक्‍तराज महाराज आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सूक्ष्मातून आधीच तेथे असल्‍याची अनुभूतीही आम्‍हाला आली.’

– श्री. शंभू गवारे, रांची, झारखंड. (१६.७.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक