सध्‍या चालू असलेल्‍या अधिक मासाची शास्‍त्रोक्‍त माहिती : शुभ फळ देणारा ‘अधिक मास’ !

‘यावर्षी अधिक श्रावण मास आहे. ज्‍याला मलमास अथवा पुरुषोत्तम मास असे म्‍हटले जाते. सध्‍या सामाजिक माध्‍यमांमधून या अधिक मासात कोणती धर्मकृत्‍ये करावीत ? आणि कोणती करू नयेत ? यांविषयी थोडी खरी आणि शास्‍त्राचा आधार नसलेली बहुतांश खोटी माहिती प्रसारित होत असते. त्‍यामुळे सश्रद्ध हिंदूंमध्‍ये अनेक अपसमज निर्माण होतात. चुकीच्‍या काळात जाणतेपणी अथवा अजाणतेपणी केलेले धर्मकृत्‍य आपल्‍याला शुभ पुण्‍यफळ देत नाही. धर्मकार्याचे शुभ फळ मिळण्‍यासाठी काळाचा योग्‍य आणि सुसंगत समन्‍वय साधणे अन् योग्‍य काळी योग्‍य कर्म करणे, हे ऋषि-मुनींना अभिप्रेत आहे. त्‍यामुळेच अन्‍य कोणत्‍याही धर्मांच्‍या पंचांगामध्‍ये नसलेली अत्‍यंत परिपूर्ण कालगणना हिंदु धर्मामध्‍ये आहे. यासाठी आपल्‍या ऋषि-मुनींनी किती कठोर उपासना आणि संशोधन केले असेल, याची केवळ कल्‍पनाच केलेली बरी !

(भाग-१)

१. अधिक मास आणि क्षयमास यांविषयी…

चांद्रमास आणि सौरमास या दोघांचा समन्‍वय साधण्‍यासाठी सनातन वैदिक हिंदु धर्मामध्‍ये ‘अधिक मास’ अथवा ‘पुरुषोत्तम मास’ अथवा ‘क्षयमास’ अशी योजना करण्‍यात आली आहे. अधिक मास हा आयुष्‍यात अनेकदा अनुभवता येतो; पण क्षयमास क्‍वचित् अनुभवता येतो. प्रत्‍येक मासात सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीमध्‍ये प्रवेश करतो. त्‍याला ‘संक्रांत’ अशी संज्ञा आहे. आपणाला मकर आणि कर्क या प्रमुख दोन संक्रांती माहिती असतात; प्रत्‍येक मासात एक संक्रांत होते. ज्‍या मासात सूर्यसंक्रांत होत नाही, त्‍या मासाला ‘अधिक मास’ म्‍हणतात. ज्‍या मासात दोन वेळा संक्रांत येते, त्‍या मासाला ‘क्षयमास’ म्‍हणतात. शास्‍त्रानुसार या दोघांनाही ‘अधिक मास’ म्‍हणतात.

वेदमूर्ती श्री. भूषण दिगंबर जोशी

२. क्षयमास आणि अधिक मास कधी येतात ?

दोन अधिक मासांमधील अंतर हे ३० मास उलटून गेल्‍यावर ८ किंवा ९ मास होण्‍याच्‍या आत असते. क्षयमास हा १४० वर्षांनी अथवा १९ वर्षांनी एकदा येतो. अधिक मासाप्रमाणे अनुमाने तीन-साडेतीन वर्षांनी येत नाही. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष या पैकीच एक मास हा क्षयमास असतो, अन्‍य मास क्षयमास नसतात. क्षयमासाच्‍या आधी आणि नंतर असे दोन अधिक मास येतात. क्षयमासाच्‍या आधी येणार्‍या अधिक मासाला ‘संसर्ष’, तर क्षयमासाला ‘अंहस्‍पति’ अशी संज्ञा आहे.

३. शास्‍त्रानुसार आचरण केल्‍यास  निश्‍चितच शुभ फळ !

आपल्‍याकडे प्रत्‍येक गोष्‍टीला विशेष संज्ञा योजलेल्‍या आहेत. बर्‍याचदा अनेकांना या संज्ञा माहिती नसतात. जी मंडळी या संज्ञा वापरून नीट माहिती देतात, त्‍यांच्‍यावर आपल्‍या अज्ञानामुळे आपण टीका करतो. त्‍यामुळे सश्रद्ध आस्‍तिक हिंदु मंडळीसाठी हा प्रपंच आहे. कुणी काय सांगितले ? आणि मला काय वाटते ? याहून शास्‍त्रानुसार अधिक मासात नक्‍की कोणते कर्म करावे ? आणि काय करू  नये ? हे जाणून तसे आचरण केल्‍यास निश्‍चितच शुभ फळ मिळेल, यात शंका नसावी.’

(क्रमश: उद्याच्‍या अंकात)

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्‍हा सिंधुदुर्ग (१३.७.२०२३)