(म्हणे) ‘संरक्षणाचा सौदा करणार्‍यांसाठी देश पहिला कि वासना ?’ – असदुद्दीन ओवैसी

‘मुसलमानांसाठी देश प्रथम कि धर्म’ या प्रश्‍नाला असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून बगल !

भाग्यनगर (तेलंगाणा) – गुप्तचर विभागाच्या वरिष्ठ पदांवर एकही मुसलमान अधिकारी नाही. भाजप मुसलमानांकडे संशयाच्या दृष्टीने पहातो. हा त्याचाच परिणाम आहे. गुप्तचर विभाग आणि रॉ (रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग) या दोन्ही संस्था आता पूर्णपणे बहुसंख्यांकाच्या (हिंदूंच्या) संस्था बनल्या आहेत. याचे कारण हे की, भाजप सातत्याने मुसलमानांकडे त्यांच्या निष्ठेचे पुरावे मागत आहे. त्यांना बरोबरीचा दर्जा दिला जात नाही, असे ट्वीट एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी २३ जुलै या दिवशी केले होते. यावर त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला.

या विरोधानंतर ओवैसी यांनी पुन्हा ट्वीट करत ‘संरक्षणाचा सौदा करणार्‍यांसाठी देश पहिला कि वासना ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. यातून त्यांनी हिंदु अधिकारी वासनेच्या आहारी जाऊन पाकला गोपनीय माहिती देतांना पकडले गेल्याविषयी बोट दाखवले आहे.

१. प्रसिद्ध कवी कुमार विश्‍वास यांनी ओवैसी यांना उद्देशून म्हटले, ‘‘केवळ दोन गोष्टी सांगा. इस्लाम आणि भारत या दोन पैकी एक गोष्ट निवडण्याची वेळ आली, तर तुम्ही काय निवडाल ?, तसेच कुराण शरीफ आणि राज्यघटना यांपैकी एक गोष्ट निवडण्याची वेळ आली, तर तुम्ही काय निवडाल ? तुमच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असलेला एक भारतीय सनातनी !’’

२. असदुद्दीन ओवैसी यांनी स्वतःच्या ट्वीटला होत असलेला विरोध पाहून आणखी एक ट्वीट करत म्हटले की, मुसलमानांना विचारले जाते, ‘धर्म आणि देश यांपैकी कोणत्या गोष्टीची निवड कराल ? त्याचवेळी असे अनेक लोक आहेत, जे देशाच्या संरक्षणाचा सौदा करतांना पकडले गेले आहेत. आय.एस्.आय. महिलांची खोटी खाती बनवून या लोकांना त्यांच्या जाळ्यात ओढते. धर्माची गोष्ट लांब राहिली. कुणीतरी त्यांना विचारा की, ते वासना आणि देश यांपैकी कशाची निवड करतात ?

संपादकीय भूमिका

भारताच्या संरक्षणाला सुरुंग लावणार्‍यांच्या विरोधात भारत सरकार कटीबद्धच आहे ! मुसलमानांसाठी देश पहिला आहे कि नाही ? यावर ओवैसी पळपुटी भूमिका घेतात, हे मात्र खरे !