श्रीलंकेच्या नौदलाकडून ९ भारतीय मासेमारांना अटक

कोलंबो – श्रीलंकेच्या नौदलाने त्याच्या समुद्री क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्रवेश करून मासेमारी केल्याच्या प्रकरणी ९ भारतीय मासेमारांना अटक केलीे. या वेळी श्रीलंकेच्या नौदलाने या मासेमारांच्या २ नौकाही कह्यात घेतल्या. हे सर्व भारतीय मासेमार तमिळनाडूतील असल्याचे श्रीलंकेच्या नौदलाने म्हटले आहे.

सौजन्य एएनआय न्यूज 

श्रीलंकेच्या नौदलाने राबवलेल्या एका विशेष अभियानाच्या अंतर्गत भारतीय मासेमारांना अटक करण्यात आली, असे सांगण्यात येत आहे. या मासात श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मासेमारांना अटक केल्याची ही दुसरी घटना आहे. ९ जुलै या दिवशी बेकायदेशीररित्या श्रीलंकेच्या समुद्री क्षेत्रात प्रवेश केल्याच्या प्रकरणात श्रीलंकेच्या नौदलाने १५ मासेमारांना अटक केली होती. ‘भारतीय मासेमारांकडून आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेचे उल्लंघन केले जाते’, असे श्रीलंकेच्या नौदलाकडून वारंवार सांगितले जाते. याविषयी भारत आणि श्रीलंका यांच्यात उच्चस्तरीय बैठका आयोजित केल्या गेल्या आहेत; मात्र ही समस्या अद्यापही सुटलेली नाही. (ही समस्या न सुटण्यामागे काय कारणे आहेत ?, तसेच भारतीय मासेमारांना आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा निश्‍चित करू देण्यामागे काय अडचणी आहेत ?, हे भारतीय जनतेला समजायला हवे ! – संपादक)