गोवा : आज प्रारंभ होणार्‍या चौथ्या ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाच्या बैठकीत ६ प्राधान्ये

भारताच्या जी-२० – चौथ्या ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाची बैठक

पणजी, १८ जुलै (पसूका) – भारताच्या जी-२० अध्यक्षतेखाली चौथी ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाची बैठक (ईटीडब्ल्यूजी) १९ आणि २० जुलै २०२३ असे २ दिवस गोव्यात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या कार्यकारी गटाचे अध्यक्ष अन् सचिव पवन अग्रवाल असतील.

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या अंतर्गत ६ प्राधान्य क्षेत्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. ६ प्राधान्य क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

१. तंत्रज्ञानातील त्रुटी दूर करून ऊर्जा संक्रमण
२. ऊर्जा संक्रमणासाठी अल्प गुंतवणुकीत वित्तपुरवठा
३. ऊर्जा सुरक्षा आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी
४. ऊर्जा कार्यक्षमता
५. औद्योगिक अल्प कार्बन संक्रमण अन् दायित्वपूर्ण वापर
६. भविष्यासाठी इंधन अन् स्वच्छ ऊर्जेसाठी सार्वत्रिक सुलभता आणि न्याय्य, परवडणारे अन् सर्वसमावेशक ऊर्जा पारेषण

ही ६ प्राधान्य क्षेत्रे आपल्या ‘एक पृथ्वी’ चे पर्यावरण रक्षण करण्यावर, आपल्या ‘एक कुटुंब’ या ध्येयाला अनुसरून सुसंवाद निर्माण करण्यावर आणि ‘एक भविष्य’ यावर लक्ष केंद्रित करतात.

चौथ्या बैठकीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्रीस्तरीय निवेदनाच्या मसुद्यावर होणारी सविस्तर चर्चा ही आहे. बैठकीला जोडूनच विविध अन्य कार्यक्रमांचे (साइड इव्हेंट्सचे) आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छ ऊर्जा विषयांवर लक्ष केंद्रित करून ८० हून अधिक साइड इव्हेंट्स आयोजित केले जात आहेत. जगभरातील प्रमुख व्यावसायिक आणि ऊर्जा नेते या बैठकांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. गोव्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात जगभरातील इलेक्ट्रिक वाहने, हायड्रोजन आणि इतर स्वच्छ तंत्रज्ञानासारखे नवीन अन् उदयोन्मुख तंत्रज्ञान सादर केले जाईल आणि अभ्यागतांना एक अनोखा अनुभव मिळेल.

चौथी ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाची बैठक २० जुलैला संपणार आहे. बैठकांचा समारोप होणारी मंत्रीस्तरीय बैठक २२ जुलैला पार पडणार आहे. मंत्रीस्तरीय बैठकीत जी-२० आणि इतर निमंत्रित देशांचे मंत्री अन् प्रतिनिधी सहभागी होतील.