पुणे येथे घराबाहेर गणेशमूर्ती स्‍थापित केल्‍याने दांपत्‍याला ठोठावला साडेपाच लाखांचा दंड !

पुणे येथे घराबाहेर गणेशमूर्ती स्‍थापित केल्‍याने दांपत्‍याला ठोठावला साडेपाच लाखांचा दंड

पुणे – येथे घराबाहेर गणपतीची मूर्ती स्‍थापित केल्‍याने होनावर दांपत्‍याला सोसायटीने ५ लाख ६२ सहस्र रुपयांचा दंड केला आहे. २० वर्षांनंतर हा दंड ठोठावण्‍यात आला आहे. वानवडी येथील ‘फ्‍लॉवर व्‍हॅली सहकारी गृहरचना सोसायटी’मध्‍ये ही घटना घडली. हा वाद आता न्‍यायालयात पोचला असून ‘गणेशमूर्ती आम्‍ही हालवणार नाही’, असे  दांपत्‍याने म्‍हटले आहे.

१. श्री. सतिश आणि सौ. संध्‍या होनावर या दांपत्‍याने वर्ष २००२ मध्‍ये सातव्‍या मजल्‍यावर घर खरेदी केले. घर खरेदी केल्‍यावर पुजार्‍याने त्‍यांना घराच्‍या बाहेर मूर्ती स्‍थापित करायला सांगितल्‍याने त्‍यांनी ती मूर्ती घराबाहेर स्‍थापित केली होती.

२. वर्ष २०१९ मध्‍ये सोसायटीवर नवीन कार्यकारिणी आल्‍यावर नव्‍या नियमानुसार ‘सदनिकेच्‍या बाहेर सोसायटीची जागा असून तेथे कोणतेही सामान ठेवल्‍यास महिन्‍याच्‍या टॅक्‍सच्‍या पाचपट रक्‍कम दंड म्‍हणून वसूल करण्‍यात येईल’, असे सांगण्‍यात आले.

३. कार्यकारिणीने होनावर यांना ‘घराबाहेर स्‍थापित केलेली गणपतीची मूर्ती काढा’, अशी नोटीस पाठवली; पण होनावर यांनी मूर्ती न काढल्‍याने सोसायटीने त्‍यांना दंड ठोठावला आहे.

‘नोटीस दिल्‍यापासून आम्‍ही न्‍यायालयीन लढाई लढत आहोत. आम्‍ही केले ते चुकीचे नाही. हे लोक आमच्‍यावर दबाव आणत आहेत. मजल्‍यावरील लोकांना मूर्तीचा त्रास नाही. मग सोसायटीलाच का वाटतो ?’, असे होनावर यांचे म्‍हणणे आहे. सोसायटीचे सचिव कल्‍याण रामायण म्‍हणाले, ‘‘आधीच्‍या लोकांनी कारवाई केली नाही. आता आम्‍ही कायदेशीर मार्गाने दंड आकारत आहोत.’’