जागतिक स्तरावर महासागरांतील ५६ टक्के पाण्याचा रंग झाला हिरवा !

निसर्गाला घातक असलेल्या हवामान पालटांचा असाही परिणाम !

लंडन (इंग्लंड) – जगातील सर्व सात महासागरांतील पाण्याचा रंग पालटत असून एकूण ५६ टक्के पाण्याचा रंग हिरवा झाला आहे. पाण्याचा हा भूभाग पृथ्वीवरील एकूण भूमीपेक्षाही अधिक आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ आणि अन्य संस्था यांच्या संशोधकांनी हे निरीक्षण नोंदवले आहे. यामध्ये प्रामुख्याने पृथ्वीच्या भूमध्य रेषेच्या जवळच्या क्षेत्रांतील महासागराचा रंग हिरवा होत चालला आहे. हा पालट गेल्या २० वर्षांत झाल्याचे एक अध्ययन सांगते. यामागील कारण हे जागतिक स्तरावर होत असलेला हवामान पालट असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ‘नेचर’ या जागतिक वैज्ञानिक जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. महासागराचा पालटता रंग मानवी डोळ्यांना दिसू शकत नाही, असेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

महासागरातील वरच्या थरातील पाण्यामध्ये सिद्ध झालेले ‘फायटोप्लँक्टन’ या जिवाणूंत असलेल्या ‘क्लोरोफिल’ या रंगद्रव्यामुळे पाण्याचा रंग हिरवा होत चालला आहे, असे वैज्ञानिक सांगतात. युनायटेड किंगडमच्या साऊथॅम्पटन येथील ‘नॅशनल ओशनोग्राफी सेंटर’चे मुख्य लेखक बीबी कैल आणि त्यांच्या संघाने वर्ष २००२ ते २०२२ या कालावधीत पृथ्वीवरील सर्व सात महासागरांचे निरीक्षण केले असता त्यांनाही हाच भाग आढळून आला.

संपादकीय भूमिका 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिरेकी उपयोगामुळे निसर्गाची भरून न येणारी हानी होत आहे. या माध्यमातून विज्ञानाधिष्ठित मानवसमूह स्वत:चा विनाशच ओढवून घेत आहे, हे लक्षात घ्या !