प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेला ५५ टक्के पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला विरार (मुंबई) येथील चि. वेद हेमंत पुजारे (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. वेद हेमंत पुजारे हा या पिढीतील एक आहे !

आषाढ कृष्‍ण एकादशी (१३.७.२०२३) या दिवशी चि. वेद पुजारे याचा तिसरा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याच्‍या वडिलांना त्‍याच्‍या आईच्‍या गर्भारपणाविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

चि. वेद पुजारे याला तृतीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

चि. वेद पुजारे

१. पत्नीच्‍या गर्भारपणात तिच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे

१ अ. पत्नीला गर्भधारणा झाल्‍यावर तिने साधना आणि नामजपादी उपाय करण्‍यास आरंभ करणे : ‘गर्भधारणेपूर्वी माझी पत्नी (सौ. हर्षाली) साधना आणि नामजपादी उपाय यांकडे फारसे लक्ष देत नसे. तिला गर्भधारणा झाल्‍याचे समजल्‍यापासून ती सकाळी ९.३० ते १० या वेळेत नामजप करू लागली. या कालावधीत तिने नियमित शरिरावरील त्रासदायक आवरण काढणे, कापूर आणि अत्तर यांचे उपाय करणे चालू केले. तेव्‍हा मला वाटले, ‘देवच तिच्‍याकडून नामजपादी उपाय करून घेत आहे.’ त्‍यानंतर ती सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेले नामजपादी उपाय आणि कोरोनाचा काळ चालू असल्‍याने नियमित १ घंटा कोरोनासाठीचा नामजपही करत होती.

१ आ. श्रीकृष्‍ण आणि गणपति यांना प्रार्थना केल्‍यावर गर्भाची हालचाल जाणवणे : तिला दिवसभर गर्भाची हालचाल जाणवत नसे. ती नामजपादी उपाय करत असतांनाच तिला गर्भाची हालचाल जाणवत असे. काही वेळा तिला गर्भाची जराही हालचाल जाणवत नसल्‍याने आम्‍हाला काळजी वाटत असे. त्‍या वेळी ती श्रीकृष्‍ण आणि गणपति यांना प्रार्थना करत असे. तेव्‍हा तिला गर्भाची हालचाल जाणवत असे. त्‍याच्‍या हालचालीतून तो ‘मी बरा आहे’, असे सांगत आहे’, असे तिला जाणवायचे. मग ती कृतज्ञता व्‍यक्‍त करत असे.

१ इ. नवव्‍या मासात ६०० कि.मी. अंतरावर असलेल्‍या गावी जातांना प्रवासाचा जराही त्रास न होणे : हर्षालीला ८ व्‍या मासात मुंबई येथे रुग्‍णालयात भरती करायचे होते. तेव्‍हा कोरोनामुळे तिला रुग्‍णालयात भरती करण्‍यात अडचणी येत होत्‍या. त्‍यामुळे आम्‍ही ९ व्‍या मासात गावी जाण्‍याचा निर्णय घेतला. त्‍या वेळी ६०० कि.मी. अंतर पार करतांना हर्षालीला प्रवासाचा जराही त्रास झाला नाही. हे अंतर आम्‍ही १२ घंट्यांतच पार केले.

सौ. हर्षाली पुजारे

२. प्रसुतीच्‍या वेळी

२ अ. प्रसुतीच्‍या शेवटच्‍या १० दिवसांत हर्षालीचा रक्‍तदाब वाढला होता. तेव्‍हा तिला अन्‍य काही त्रास नव्‍हता. तिने सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केले. तिची प्रसुती ‘नॉर्मल’ (नैसर्गिकरित्‍या) झाली.

२ आ. तिला मुंबई येथील रुग्‍णालयात भरती करण्‍यात पुष्‍कळ पैसे व्‍यय झाले असते; परंतु गावी शासकीय रुग्‍णालयात तिची प्रसुती झाल्‍याने एकही रुपया व्‍यय करावा लागला नाही. आम्‍ही दानपेटीत ५०० रुपये ठेवले. गुरुदेवांनी आमची पैशांची काळजी मिटवली.

३. जन्‍म

बाळाचे वजन २ किलो ६०० ग्रॅम होते, तरीही त्‍याला ‘इन्‍क्‍युबेटर’मध्‍ये (टीप) ठेवले नाही. तिथेही देवाने बाळाची काळजी घेतली. (टीप : नवजात बालकाला सुरक्षित ठेवण्‍यासाठी उबदार वातावरणात असलेली काचेची पेटी)

४. जन्‍मानंतर

श्री. हेमंत पुजारे

४ अ. वय – १ ते २ मास

४ अ १. चि. वेद सतत हसतमुख असे.

४ अ २. बाळाची पत्रिका पुरोहितांना दाखवल्‍यावर त्‍यांनी ‘तुम्‍हाला मुलगा होणे’, हे श्रीकृष्‍णाचा नामजप केल्‍याचे फळ आहे’, असे सांगणे : त्‍याच्‍या बारशाच्‍या आधी पुरोहितांनी बाळाची पत्रिका पाहून मला विचारले, ‘‘तुम्‍ही श्रीकृष्‍णाचा नामजप करता का ?’’ तेव्‍हा मी ‘‘हो’’, असे म्‍हटल्‍यावर त्‍यांनी ‘त्‍या जपाचेच हे फळ आहे’, असे मला सांगितले. ते मला म्‍हणाले, ‘‘मुलाची पत्रिका सुंदर आहे. तो अनेक कला लवकर अवगत करील.’’ मी त्‍यांची दक्षिणा रुपये १०१ पटलावर ठेवले. पुरोहित पैसे उचलत असतांना त्‍यातील १ रुपया खाली पडून त्‍यांच्‍या घरासमोरील दत्त मंदिराच्‍या पायरीजवळ जाऊन पडला. तेव्‍हा पुरोहित म्‍हणाले, ‘‘बघा, देवाने त्‍याचा वाटा घेतला.’’

४ अ ३. नामकरण विधीच्‍या दिवशी बाळाचा चेहरा हनुमंतासारखा दिसणे : सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी बाळाचे नाव सुचवले. तेव्‍हा घरी सर्वांना आनंद झाला. नामकरण विधीच्‍या दिवशी बाळाचे नाव ‘वेद’ असे ठेवल्‍यावर त्‍याचा चेहरा हनुमंतरायासारखा दिसत होता.

४ अ ४. वेद झोपतांना हाताच्‍या मुद्रा करत असे.

४ अ ५. वेद एक मासाचा असतांना रात्री झोपत नसल्‍यास ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप भ्रमणभाषवर लावल्‍यावर लगेच शांत झोपत असे. तो रडत असतांना श्रीकृष्‍णाचा पाळणा आणि श्रीकृष्‍णाष्‍टक लावल्‍यावर शांत होत असे.

४ आ. वय – ३ ते ६ मास

४ आ १. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे भक्‍तीसत्‍संगातील बोलणे स्‍थिर राहून ऐकणे : आम्‍ही त्‍याला भ्रमणभाषवर नवरात्रीतील ९ दिवस श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे भक्‍तीसत्‍संगातील बोलणे ऐकवत होतो. तेव्‍हा तो पुष्‍कळ आनंदी असे. त्‍याला भक्‍तीसत्‍संग ऐकायला आवडत असे. तो ३० ते ४५ मिनिटांपर्यंत स्‍थिर राहून सत्‍संग ऐकत असे.

४ इ. वय – ७ मास ते १ वर्ष

१. वेदला कसलीच भीती वाटत नसे.

२. वेदला ‘श्रीकृष्‍ण कुठे आहे ?’, असे विचारल्‍यावर तो श्रीकृष्‍णाच्‍या चित्राकडे बोट दाखवून त्‍या चित्राची पापी घेत असे.

३. त्‍याला ‘कोणत्‍याच गोष्‍टीची आसक्‍ती नाही’, हे लक्षात येते.

४. माझी आई आणि पत्नी नेहमी वेदला अत्तर अन् कापूर लावतात, तेव्‍हा तो हसतो. ते त्‍याला आवडते.

४ ई. १ वर्षानंतर

४ ई १. प्रेमभाव

अ. वेदला घरात पुष्‍कळ माणसे असलेली आवडतात. त्‍याची सर्व लहान मुलांशी लवकर मैत्री होते. गावी असलेले त्‍याचे आजी आणि आजोबा यांची तो भ्रमणभाषवर विचारपूस करतो.

आ. एकदा आम्‍हाला ठाणे सेवाकेंद्रात सद़्‍गुरु अनुताईंना भेटायला जायचे होते. वेदला ‘सद़्‍गुरु अनुताईंकडे जायचे आहे’, असे सांगितल्‍यावर त्‍याला फार आनंद झाला. आम्‍ही ठाणे सेवाकेंद्रात गेल्‍यावर त्‍याला सर्व साधकांची ओळख करून दिली. तो सेवाकेंद्रात सगळीकडे फिरत होता. त्‍याची बांगरकाकांशी चांगली मैत्री झाली. सद़्‍गुरु अनुताईंनी वेदला लाडू दिला. तेव्‍हा त्‍याने बांगरकाकांसाठीही एक लाडू मागून घेतला. तेव्‍हा सद़्‍गुरु अनुताईंनी सांगितले, ‘‘वेदमध्‍ये प्रेमभाव पुष्‍कळ आहे.’’

४ ई २. सेवा करण्‍याची आवड : त्‍याला मी ‘सेवेसाठी बाहेर जात आहे’, असे सांगितल्‍यावर तो म्‍हणतो, ‘‘मलाही सेवेला यायचे आहे. मला घेऊन चला.’’

४ ई ३. वेद २ वर्षांचा असल्‍यापासून आमच्‍यासह कृष्‍ण आणि श्री गुरु यांचा श्‍लोक म्‍हणतो अन् जयघोष करतो.

४ ई ४. देवाची ओढ : आम्‍ही दुचाकी गाडीवर बसल्‍यावर जयघोष करायला विसरलो, तर तो आम्‍हाला जयघोष करण्‍याची आठवण करून देतो. तो आम्‍हाला रात्री झोपतांना प्रार्थना करण्‍याची आठवण करतो.

४ ई ५. सात्त्विकतेची आवड : आम्‍ही घातलेले कपडे भडक रंगांचे असतील, तर तो आम्‍हाला सांगतो, ‘‘हे चांगले वाटत नाही. दुसरे कपडे घाला.’’

४ ऊ. भाव

४ ऊ १. आम्‍ही त्‍याला लहानपणीच ‘प्रत्‍येक कृती करतांना ‘जय श्रीराम आणि जय हनुमान’, असे म्‍हटले, तर देव आपल्‍याला शक्‍ती देतो’, असे सांगितले आहे. तो इमारतीचे जिने चढतांना दमला असता ‘जय श्रीराम’, असे म्‍हणतो.

४ ऊ २. त्‍याला कोणतीही वस्‍तू मिळाली की, तो म्‍हणतो, ‘‘ती देवानेच दिली.’’

४ ऊ ३. आम्‍ही वेदला मुंबई येथील वर्ष २०२३ मधील ‘हिंदु एकता दिंडी’ दाखवत होतो. त्‍यात मुंबादेवी आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची पालखी होती. त्‍याने दोन्‍ही पालख्‍यांना नमस्‍कार केला. तो तेथून घरी यायला सिद्ध नव्‍हता.

४ उ ४. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर देवबाप्‍पा आहेत’, असे सांगणे : परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये परात्‍पर गुरु डॉक्‍टर, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्‍या वेळी वेदला विचारले ‘‘हे कोण आहेत ?’’ तेव्‍हा त्‍याने परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या छायाचित्रावर हात ठेवून ‘‘हे देवबाप्‍पा आहेत’’, असे सांगितले.

५. वेदमधील स्‍वभावदोष : हट्ट करणे, पुष्‍कळ मस्‍ती करणे, उलट बोलणे आणि स्‍वत:ची वस्‍तू इतरांना न देणे’

६. कृतज्ञता : आम्‍हा सर्वांना वेद घरी असला की, वातावरण सात्त्विक असल्‍यासारखे वाटते. या गुरुदेवांच्‍या कृपेसाठी त्‍यांच्‍या चरणी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरीही ती अल्‍पच आहे.’

– श्री. हेमंत पुजारे (चि. वेदचे वडील), विरार, मुंबई

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक