बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार : १५ जण ठार !

  • मतदान केंद्राची तोडफोड, जाळपोळ

  • मतपेटी पळवली !

  • गावठी बाँबचा सर्रास वापर

  • गोळीबाराच्याही घटना

कोलकाता (बंगाल) – बंगाल राज्यात ८ जुलै या दिवशी २२ जिल्ह्यांतील ६४ सहस्र ८७४ ग्रामपंचायतींच्या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून येथे हिंसाचार चालू झाला होता आणि तो प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही मोठ्या प्रमाणात दिसून आला. गेल्या २४ घंट्यात राज्यात हिंसाचारात १५ जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापूर्वी निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ७ जुलैपर्यंत १५ जणांचा हिंसाचारात मृत्यू झाला होता.

१. ‘सनातन प्रभात’ला स्थानिक विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही सहस्र मतदान केंद्रे लुटण्यात आली असून किमान १० संवेदनशील केंद्रांवर सकाळी ७ ते ८.२० या कालावधीतच मतदान पूर्ण करण्यात येऊन तेथील मतदान यंत्रे ‘सील’ (बंद) करण्यात आली.

२. कूचबिहारच्या सीताई येथील बारविता प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली आणि मतपत्रिका जाळण्यात आल्या. तसेच याच जिल्ह्यात एका मतदान केंद्रातील मतपेटी पळवून नेऊन ती तलावात फेकण्यात आली, तर दिनहाटा भागातील एका मतदान केंद्रातील मतपेटीत पाणी ओतण्यात आले. येथील बारनाचिनातील मतदान केंद्रात बोगस मतदान झाल्यावरून मतदारांनी मतपेटीला आग लावली.

३. कूचबिहारच्या फलीमारी पंचायतीतील एका मतदान केंद्रावर गुंडांनी गावठी बाँबद्वारे केलेल्या आक्रमणात भाजपच्या उमेदवार माया बर्मन यांचे पोलिंग एजंट माधव विश्‍वास ठार झाले. माया बर्मन यांनी सांगितले, ‘तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी माझ्या पोलिंग एजंटवर गावठी बाँब फेकला आणि त्यांना ठार मारले. माझ्यावरही आक्रमण करण्यात आले.’ अन्य एका मतदानकेंद्रावरही भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली.

४. काही ठिकाणी २ गटांनी एकमेकांवर गावठी बाँब फेकले. मतदानापूर्वी पहाटे मुर्शिदाबाद येथील समशेरगंज भागात तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

५. पूर्व बर्धमानमध्ये माकपच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याचेही वृत्त आहे. उत्तर दिनाजपूरच्या चाकुलियामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली.

६. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बासुदेबपूरच्या मतदान केंद्रावर जात असतांना राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांना माकपच्या उमेदवारांनी रोखले आणि त्यांच्या समस्या सांगितल्या. राज्यपालांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.

ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनजी बंगालला लुटत आहेत ! – विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांचा आरोप

सुवेंदु अधिकारी

बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार सुवेंदु अधिकारी यांनी म्हटले, ‘निवडणुकीच्या काळात बंगाल जळत आहे. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी बंगालला आगीत ढकलले आहे. केंद्र सरकारने केंद्रीय सुरक्षा दलांना राज्यात तैनात केले पाहिजे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी बंगालला लुटत आहेत. बंगाल स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे. आम्ही तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना ती नष्ट करू देणार नाही. राज्याचे निवडणूक आयुक्त राजीव सिन्हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत आहेत.’

राज्यात कलम ३५६ लागू करा ! – अंजनी पुत्र सेना, कोलकाता

अंजनी पुत्र सेनेचे सचिव श्री. सुरेंद्र कुमार वर्मा

तृणमूल काँग्रेसने केलेल्या भयावह हिंसाचारावर अंजनी पुत्र सेनेचे सचि‍व श्री. सुरेंद्र कुमार ‍वर्मा यांनी राज्यात लोकशाही अबाधित राखण्यासाठी राज्यपालांकडे राज्य सरकार विसर्जित करून कलम ३५६, म्हणजे राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी केली. त्यांनी ‘सनातन प्रभात’ला यासंदर्भात माहिती दिली.

(म्हणे) ‘केंद्रीय सुरक्षादल कुठे आहेत ?’ – सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा प्रश्‍न

सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने ट्वीट करून म्हटले आहे की, रेजीनगर, तुफानगंज आणि खारग्राम येथे आमच्या पक्षाच्या ३ कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. डोकमोल येथे २ कार्यकर्त्यांना गोळी लागली आहे. भाजप, माकप आणि काँग्रेस राज्यात केंद्रीय सुरक्षादलांना तैनात करण्याची मागणी करत आहे, तर हे दल कुठे आहेत ?  (बंगाल पोलिसांनी हिंसाचार का रोखला नाही, याचे उत्तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने सर्वप्रथम दिले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !