माणसाच्या हातात धारदार शस्त्र असण्यापेक्षा मन धारदार विचारांनी बळकट हवे  ! – अभिजित हेगशेट्ये, अध्यक्ष, नवनिर्माण शिक्षण संस्था

  • नवनिर्माण शिक्षण संस्थेत राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन

  • ८ जुलैपर्यंत असणार कार्यशाळा

रत्नागिरी कार्यशाळेत बोलतांना अभिजित हेगशेट्ये, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, महिला व बालविकास विभागाचे आर्. बी. काटकर, सायबर सेलचे नितीन पुरळकर, नजमा मुजावर, भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या समुपदेशक जान्हवी पाटील.

रत्नागिरी – माणसाच्या हातात धारदार शस्त्र असण्यापेक्षा मन धारदार विचारांनी मजबूत असायला हवे. संपूर्ण जग लिंगभेद मानत नसतांना मुली असुरक्षित असणे, हे दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी केले. राज्यशासनाच्या महिला व बालविकास कक्ष आणि नवनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण अन् प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. ६ जुलै या दिवशी संस्थेच्या बृहत् भारतीय सभागृहात या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अध्यक्षस्थानी अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, महिला व बालविकास विभागाचे आर्.बी. काटकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील १००० मुलींना येत्या ६ ते ८ जुलै या काळात स्वसंरक्षणाचे धडे आणि प्रात्यक्षिक शिकवले जाणार आहे.

या वेळी हेगशेट्ये म्हणाले, ‘‘सोळाव्या शतकात महिलांच्या सुरक्षित जीवनाचे धडे राजमाता जिजाऊंच्या तालमीत छत्रपती शिवरायांनी गिरवले. त्याचा परिणाम असा झाला की, शिवरायांनी महिलांवर अत्याचार करणार्‍याचे हात-पाय कलम केले. अशी शिक्षा दिल्याने महिलांवर अत्याचार करण्याचे धाडस त्या वेळी कुणाचे झाले नाही. महिलेचे संरक्षण करणे आणि तिचा सन्मान करणे, हा वारसा १६ व्या शतकापासून महाराष्ट्राला शिवरायांनी घालून दिला आहे. हाच वारसा जपायला हवा. तो वारसा जपताना महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कठोरात कठोर आणि तात्काळ शासन व्हायला हवे.’’

या वेळी प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी मनोगत व्यक्त करून मुलींचे मनोबल वाढवले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्.बी. काटकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. सुशील साळवी यांनी केले. आभार प्रा. पूर्णिमा सरदेसाई यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

सामाजिक माध्यमांचा वापर दायित्वपणे करा ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, ‘‘सामाजिक माध्यमांचा वापर दायित्वपणे करावा. मुलींनी त्यांची माहिती सामाजिकपणे उघड करणे धोकादायक आहे. आई-वडील हेच आपले पहिले मित्र असल्याने आपल्यावर अत्याचार होत असेल, तर आई-वडिलांना विश्वासात घेऊन सांगायला हवे. त्याच वेळी पोलीस हेल्पलाईन ११२ या क्रमांकावर संपर्क साधायला हवा, असे केल्यास पोलीस तक्रार केल्यापासून ८ ते १० मिनिटांत तुमच्या साहाय्याला येतील आणि पोलीस आले नाहीत, तर आमच्याकडे तक्रार करा. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.’’