न्यूयॉर्क (अमेरिका) – आज जागतिक तापमानवाढीमुळे सर्वत्र हाहा:कार माजला आहे. या सार्वत्रिक समस्येवर उपाय योजण्यासाठी जगभरातील देश विविध परिषदा घेऊन अनेक योजना राबवत आहेत. असे असले, तरी त्याचा विशेष परिणाम झालेला दिसत नाही. अशातच तापमानवाढीसाठी कारणीभूत असलेल्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक असलेल्या ‘कार्बन डायऑक्साईड’ या हानीकारक वायूच्या उत्सर्जनाच्या संदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेतील ‘द वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ या संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार या वायूच्या जगभरातील एकूण उत्सर्जनापैकी एकटी अमेरिका तब्बल २४.९ टक्के उत्सर्जनास कारणीभूत आहे.
या सर्वेक्षणानुसार अमेरिकेनंतर चीन (१४.७ टक्के), रशिया (६.९ टक्के), जर्मनी (५.५ टक्के), युनायटेड किंगडम (४.६ टक्के) आणि जपान (३.९ टक्के) या प्रगत देशांचा क्रमांक लागतो. यात भारत सातव्या क्रमांकावर असून त्याच्याकडून जगभरातील एकूण ‘कार्बन डायऑक्साईड’च्या उत्सर्जनापैकी ३.४ टक्के उत्सर्जन केले जाते. भारतानंतर फ्रान्स (२.३ टक्के), कॅनडा (२ टक्के) आणि युक्रेन (१.८ टक्के) या राष्ट्रांचा क्रमांक लागतो.
संपादकीय भूमिकाअनेक देशांच्या अंतर्गत विषयांमध्ये नाक खुपसणारी अमेरिका तिच्या कारखान्यांच्या माध्यमातून, तसेच वैज्ञानिक उपकरणांच्या अतीवापरामुळे ‘जागतिक तापमानवाढ’सारख्या भयावह समस्येला अधिक कारणीभूत आहे. यामुळे सर्व देशांनी तिला याविषयी जाब विचारला पाहिजे ! |