महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित एक दिवसाच्या संगीत कार्यशाळेला बोरी (गोवा) येथील शास्त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर आणि त्यांचे विद्यार्थी यांची उपस्थिती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आतापर्यंत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य पहाण्यासाठी एका वेळी २ – ३ कलाकार येत होते; परंतु आता या कार्यशाळेच्या निमित्ताने ४५ एवढ्या मोठ्या संख्येने संगीतप्रेमी आले होते. या आलेल्या संगीतप्रेमींमुळे ‘पुढे आपल्याला संगीत अधिवेशन, तसेच संगीत शिबिरेही घ्यावी लागतील’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अनुमाने एक – दीड वर्षापूर्वी सांगितलेले सत्यात येत असल्याचे या कार्यशाळेच्या वेळी अनुभवता आले.

हे गुरुदेवा, ‘आपणच आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्याकडून हे साधनाकार्य करून घ्या’, हीच आपल्या चरणी आर्ततेने प्रार्थना !’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

फोंडा (गोवा) – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २५.६.२०२३ या दिवशी एक दिवसाच्या संगीत कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला बोरी (गोवा) येथील शास्त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर हे त्यांच्या विद्यार्थ्यांसह उपस्थित होते. या कार्यशाळेचा लाभ ४५ विद्यार्थ्यांनी घेतला. ही कार्यशाळा सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी केले.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या नृत्य अभ्यासक सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी गायन, वादन आणि नृत्य यांचे संशोधन सांगणारी ‘पीपीटी’ (पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन – संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवणारी एक संगणकीय प्रणाली) दाखवली. त्यात त्यांनी ‘संगीत आणि नृत्य करणार्‍या व्यक्तीच्या प्रभावळीवर होणारा परिणाम सांगून वैज्ञानिकदृष्ट्याही भारतीय कलांचे श्रेष्ठत्व कसे आहे’, हा विषय समजावून सांगितला. भारतीय संगीतातील सात्त्विकता दर्शवणारे काही संगीत संशोधनपर प्रयोगांच्या ध्वनीचित्रफितीही या वेळी दाखवण्यात आल्या.

उपस्थितांना संगीताविषयीची पीपीटी दाखवतांना सौ. सावित्री इचलकरंजीकर आणि सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

श्री. गौरीश तळवलकर यांचा परिचय

श्री. गौरीश तळवलकर

श्री. गौरीश तळवलकर ‘संगीत अलंकार’ या पदवीने विभूषित आहेत. त्यांनी ‘गीत महाभारत’ आणि ‘गीत गुरुचरित्र’ या काव्यांना चाली दिल्या आहेत. त्यांनी त्यांचे अनेक कार्यक्रम केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते विद्यार्थ्यांना संगीत शिकवत आहेत.


सनातन संस्था एकमेव हिंदु धर्माच्या उत्थानासाठी कार्य करत आहे ! – गौरीश तळवलकर, बोरी, गोवा

‘सनातन संस्था एकमेव आहे, जी हिंदु धर्माच्या उत्थानासाठी कार्य करत आहे. सनातनचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोचले पाहिजे. मी आणखी लोकांना घेऊन येईन.’

श्री. गौरीश तळवलकर त्यांच्या विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘मला असे प्रामुख्याने वाटत असल्याने मी आपल्या सर्वांना येथे येण्यासंदर्भात सांगितले.’’

१. ‘श्री. गौरीश तळवलकर यांच्या गायनाचा संशोधनात्मक प्रयोग सादर करून त्याविषयी सूक्ष्म परीक्षण सांगण्यात येणे

‘श्री. गौरीश तळवलकर यांच्या गायनाचा संशोधनात्मक प्रयोग घेण्यात आला. त्यांनी या वेळी राग ‘यमन’चे गायन केले. श्री. गौरीश तळवलकर यांच्या गाण्याला तबल्यावर श्री. रुद्राक्ष वझे यांनी आणि संवादिनीवर कु. गोपाळ तळवलकर (वय १२ वर्षे) याने साथ केली. ‘राग गायनाच्या वेळी कलाकार आणि वातावरण यांवर सूक्ष्म परिणाम काय होतो ?’, याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप, श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी उपस्थितांना सांगितले. प्रयोगाचे सूक्ष्म परीक्षण ऐकल्यावर ‘आज एका वेगळ्या विषयाचा अभ्यास करायला मिळाला’, असे उपस्थितांनी सांगितले. (हे सूक्ष्म परीक्षण लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.)

२. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ या नामजपाच्या अभ्यासाच्या वेळी कार्यशाळेतील सर्वांनी भावपूर्ण नामजप ऐकणे आणि करणे

त्यानंतर संध्याकाळी उपस्थित सर्वांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला  ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप ५ मिनिटे ऐकवण्यात आला. ‘नामजप ऐकतांना काय अनुभवता येते ? ’, याचा अभ्यास या वेळी उपस्थितांना करण्यास सांगितला. सगळ्यांनी तल्लीन होऊन नामजप भावपूर्ण ऐकला आणि केला.

३. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी ‘संगीत आणि साधना’ या विषयावर मार्गदर्शन करणे

साधनेविषयी मार्गदर्शन करतांना सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या समन्वयक आणि संगीत विशारद सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी ‘संगीत आणि साधना’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी ‘संगीत कलेच्या माध्यमातून साधना करून मनुष्य जन्माचे सार्थक कशा प्रकारे करून घेता येते ?’, हे सोदाहरण सांगितले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे साधक तन, मन आणि धन यांचा त्याग करून संगीत साधना कशा प्रकारे करत आहेत ?’, हेही या वेळी विविध अनुभूतींच्या माध्यमातून त्यांनी सांगितले.

शेवटी श्री. गौरीश तळवलकर यांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’च्या माध्यमातून विविध प्रसंगी घेतलेल्या सकारात्मक ऑराच्या नोंदी सांगण्यात आल्या.

४. श्री. गौरीश तळवलकर यांच्या छायाचित्रांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ उपकरणाच्या माध्यमातून विविध प्रसंगी घेतलेल्या नोंदी

(टिप : स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.)

या नोंदींच्या माध्यमातून ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील चैतन्यमय वातावरण, गायन आणि नामजप ऐकल्यामुळे ० पासून ८.७८ मीटरपर्यंत व्यक्तीचा सकारात्मक ऑरा कसा वाढतो ? तसेच ‘५ मिनिटांच्या नामजपामुळे २ मीटर ऑरा वाढतो’, हे उपस्थितांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्वजण प्रभावित होऊन सर्वांवर साधनेचे महत्त्व बिंबले.

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

कार्यशाळेच्या शेवटी श्री. गौरीश तळवलकर आणि अन्य उपस्थित यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर ‘उपस्थितांनी पुन्हा श्रीकृष्णाचा नामजप ऐकायचा आहे’, असे सांगितले. त्यानुसार श्रीकृष्णाचा नामजप ऐकून कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

५. क्षणचित्रे

अ. ‘श्रीकृष्णाच्या नामजपाची ध्वनीचकती लावल्यावर सगळ्यांना नामजप ऐकून काय अनुभवायला येते ?’, हे अभ्यासण्यास सांगितले होते. नामजपाची ध्वनीचकती ५ मिनिटांनी थांबवल्यावरही सगळ्यांचे डोळे १० मिनिटे मिटलेले होते. त्यांना डोळे उघडावेसे वाटत नव्हते. सगळ्यांनी नामजपातून एक वेगळीच ऊर्जा मिळाल्याचे अनुभवले.

आ. कार्यशाळेच्या शेवटी श्री. तळवलकर त्यांच्या समवेत आलेल्या विद्यार्थ्यांसह २ – ३ भजने म्हणणार होते; परंतु ‘नामजप ऐकून जी स्थिती अनुभवली, ती पुन्हा अनुभवावी’, असे वाटून त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा ५ मिनिटे श्रीकृष्णाचा नामजप सगळ्यांना ऐकवण्याची विनंती केली आणि भजन म्हणणे रहित केले.

६. संगीत कार्यशाळेतील उपस्थितांनी दिलेले अभिप्राय

६ अ. श्री. गौरीश तळवलकर, बोरी, गोवा : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ‘संगीतातून साधना’ हा विषय ऐकल्यावर ‘आपण ठरवावे लागते की, ‘संगीताचा उपयोग मनोरंजनासाठी करावा कि ईश्वरप्राप्तीसाठी ?’, हे मला इथे आल्यावर कळले. मी इकडे असाच येत राहिलो, तर एक दिवस मीही तुमच्याप्रमाणेच पूर्णवेळ साधकच होईन, असे मला वाटते. संगीत शिकणारे अनेक विद्यार्थी शिबिराला अडचणींमुळे येऊ शकले नाहीत, त्यांना मी नंतर घेऊन येईन.

६ आ. सौ. अरूंधती बर्वे, शिरोडा, गोवा : मला तुमच्या कार्यात सहभागी होता आले, तर पुष्कळ आनंद होईल. मला सेवा करायची पुष्कळ इच्छा असते; पण पूर्णवेळ देता येत नाही. मला ४ दिवस आश्रमात काही सेवा करता आली, तर माझ्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.

६ इ. सौ. प्रफुल्ला सावंत-देसाई, कुडचडे, गोवा : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याविषयी बोलावे, तर माझे शब्द अपुरे पडतील ! सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, श्री. गिरिजय प्रभुदेसाई (संगीत विशारद (तबला)), तसेच अन्य साधक यांनी पुष्कळ चांगले मार्गदर्शन केले. साक्षात् परमेश्वराचे दर्शन इथेच घडल्याची प्रचीती मला तेजलताईंच्या मार्गदर्शनातून मिळाली.

कार्यशाळेत उपस्थित श्री. गौरीश तळवलकर, त्यांचे विद्यार्थी आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे साधक

७. सनातनचा आश्रम पाहून दिलेले अभिप्राय

अनेकांना रामनाथी येथील सनातनचा आश्रम पहाण्याची इच्छा असल्याने त्यांना आश्रमात चालणार्‍या विविध सेवांची माहिती करून देण्यात आली.

अ. एका वयस्कर काकूंनी सांगितले, ‘सनातनचा आश्रम बघितल्यावर जणू स्वर्गलोकात आल्यासारखे वाटते.’
आ. अनेकांनी ‘आश्रमात सेवा करणार्‍या सर्व साधकांच्या चेहर्‍यावर आनंद जाणवतो’, असे सांगितले.
इ. ‘सनातनच्या आश्रमात आल्यावर ईश्वरी चरणांशी आल्याचीच अनुभूती आली’, असे काही जणांना जाणवले. ‘सनातन आश्रमाविषयी आता आम्ही समाजात जाऊन सांगू आणि हा पवित्र आश्रम पहाण्यासाठी अवश्य घेऊन येऊ’, असे अनेकांनी सांगितले.
ई. सौ. प्रफुल्ला सावंत-देसाई, कुडचडे : आश्रमातील साधकांचा निःस्वार्थी सेवाभाव आणि आदरभाव जाणवतो. ‘ते भक्तीमार्गाकडे जाण्याचा मार्ग इतरांना दाखवत आहेत’, हे मी समाजाला सांगेन. लहान व्याख्यानातून लहान मुलांच्या अंगी हिंदु संस्कृती टिकवून ठेवण्याची मूल्ये रुजवीन. आजची पिढी ही पाश्चात्त्य विकृतीकडे भरकटत चालली आहे. त्यांना आपली हिंदु संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शन करीन. या आश्रमात मी इतरांनाही घेऊन येईन.

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४५ वर्षे), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२८.६.२०२३)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संगीत साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक