पणजी, २९ जून (वार्ता.) – राज्य सरकारकडून चालवल्या जाणार्या कदंब महामंडळाच्या बसगाड्यांवर केल्या जाणार्या गुटख्याच्या प्रातिनिधिक विज्ञापनांच्या संदर्भात सुमारे ३५० शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. या विज्ञापनांचा विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून आयोजित मादक पदार्थांच्या आहारी जाणार्या विद्यार्थ्यांसंदर्भात शिक्षकांसाठी एक राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या शिक्षकांनी कदंब महामंडळाच्या बसगाड्यांवरील प्रातिनिधिक विज्ञापनांचा निषेध केला आणि ही विज्ञापने घेणे बंद करावे, अशी मागणी केली.
एका शिक्षकाचे म्हणणे होते, ‘‘मुलांच्या भवितव्यापेक्षा या विज्ञापनांतून मिळणारी रक्कम मोठी नाही. (याचप्रमाणे कॅसिनो जुगार आणि सनबर्न संगीत महोत्सव यांमुळे होणारी भावी पिढीची हानी पहाता त्यातून मिळणार्या महसुलाला काहीच किंमत नाही ! – संपादक) आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जीस जर हा करार रहित करण्यासाठी पुढे सरसावत असतील, तर आम्ही त्यांच्यासमवेत आहोत.’’ ही विज्ञापने रहित करण्यासाठी बाल हक्क संरक्षण आयोगाने सरकारवर दबाव आणला पाहिजे, अशी मागणी या वेळी शिक्षकांनी केली.
यावर आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जीस म्हणाले, ‘‘यासंदर्भात आयोगाने कदंब महामंडळाकडे पत्रव्यवहार केला असून या विषयाचा पाठपुरावा आम्ही करत आहोत.’’
संपादकीय भूमिकाशिक्षकांना कळते ते न कळणारे प्रशासन ! |