पावसाळ्‍यामध्‍ये पचायला जड असलेले पदार्थ खाणे टाळावे !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २१०

वैद्य मेघराज पराडकर

‘चुलीमध्‍ये केवळ निखारे असतील आणि आपल्‍याला अग्‍नी पेटवायचा असेल, तर आपण चुलीत थेट मोठी लाकडे घालत नाही. तसे केले, तर अग्‍नी न पेटता केवळ धूर होईल आणि उरलेसुरले निखारेही विझून जातील. अग्‍नी चांगला पेटण्‍यासाठी आधी निखार्‍यांवर लगेच पेट घेणारे काथ्‍यासारखे (नारळाच्‍या करवंटीवरील तंतूंसारखे) इंधन घालावे लागते. त्‍यानंतर लहान काड्या-कापट्या (लहान लाकडे) घालून अग्‍नी स्‍थिर करावा लागतो.

पावसाळ्‍यामध्‍ये शरिरातील अग्‍नीही (पचनशक्‍तीही) वरील उदाहरणातील निखार्‍यांप्रमाणे मंद असतो. अशा वेळी इडली, पावभाजी, वडापाव, साबुदाण्‍याची खिचडी, श्रीखंड, पुरणपोळ्‍या, अन्‍य पक्‍वान्‍ने यांसारखे पचायला जड पदार्थ खाणे, म्‍हणजे अग्‍नीवर अत्‍याचार करणे होय. अग्‍नी मंद झाला, तर शरिरात वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन बिघडते अन् रोग होतात. त्‍यामुळे पावसाळ्‍यामध्‍ये पचायला जड पदार्थ खाऊ नयेत. खायचेच झाल्‍यास अत्‍यंत अल्‍प प्रमाणात खावेत. जेवणात जड पदार्थ असतील त्‍या वेळी नेहमीचा आहार अल्‍प घ्‍यावा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan