जळगाव येथे आंदोलनाआधी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या नेत्‍या रोहिणी खडसे पोलिसांच्‍या कह्यात !

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या रोहिणी खडसे यांच्‍यासह पदाधिकार्‍यांना पोलिस कह्यात घेताना

जळगाव – राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या २७ जून या दिवशी शहरातील दौर्‍याच्‍या आधी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या रोहिणी खडसे यांच्‍यासह पदाधिकार्‍यांना पोलिसांनी कह्यात घेतले. या वेळी नेत्‍यांसह कार्यकर्त्‍यांनी घोषणा दिल्‍या.

शहरातील जिल्‍हा पोलीस मैदानावर सायंकाळी मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांच्‍या उपस्‍थितीत ‘शासन आपल्‍या दारी’ या उपक्रमाच्‍या अंतर्गत लाभार्थ्‍यांना लाभ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमाच्‍या वेळी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि त्‍यांचे सहकारी यांनी मुख्‍यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्‍यात येणार असल्‍याची चेतावणी दिली होती. त्‍यानुसार २६ जून या दिवशी जिल्‍हा प्रशासन आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते यांची बैठक झाली.

बैठकीतील बहुतांश मागण्‍या मान्‍य करण्‍यात आल्‍या असल्‍या, तरी कपाशीच्‍या भावावर मुख्‍यमंत्र्यांनी भूमिका स्‍पष्‍ट न केल्‍यामुळे अडसर कायम राहिला असून खडसे हे आंदोलनावर ठाम राहिले होते. मुख्‍यमंत्री जळगाव येथे येण्‍याआधी दुपारी १२ वाजण्‍याच्‍या सुमारास रोहिणी खडसे यांच्‍यासह पदाधिकारी अशोक लाडवंजारी, मंगला पाटील आणि रिंकू चौधरी यांना सहकारी पदाधिकार्‍यांसमवेत आकाशवाणी चौक येथील राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या जिल्‍हा कार्यालयातून पोलिसांनी कह्यात घेतले.