सुरक्षित लैंगिक शिक्षण काळाची आवश्यकता ! – केरळ उच्च न्यायालयाचे निरीक्षण

केरळ येथे अल्पवयीन बहीण-भाऊ यांच्यातील संबंधातून बाळाचा जन्म !

तिरूवनंथपूरम् (केरळ) – राज्यात एका अल्पवयीन बहीण-भावाच्या संबंधातून बाळाचा जन्म झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावर केरळ उच्च न्यायालयाने असे प्रकरण रोखण्यासाठी ‘सुरक्षित लैंगिक शिक्षण’ काळाची आवश्यकता असल्याचे सांगत यासाठी एक समिती स्थापन करण्याचे केरळ सरकारला सुचवले आहे.

काय आहे प्रकरण ?

एका वडिलांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीची गर्भधारणा वैद्यकीयदृष्ट्या संपुष्टात आणण्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या मुलीला तिच्याच अल्पवयीन भावाकडून गर्भ राहिला होता. या याचिकेवर न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हीकृष्णन् यांच्या खंडपिठाने म्हटले की, अशा घटना सुरक्षित लैंगिकतेविषयी माहिती नसल्यामुळे घडतात. त्यामुळे ‘सुरक्षित लैंगिक शिक्षण’ काळाची आवश्यकता आहे. शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये योग्य ‘लैंगिक शिक्षण’ किती आवश्यक आहे, याचा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे.

याप्रकरणी आधी न्यायालयाने ‘सामाजिक आणि वैद्यकीय गुंतागुंत होण्याची शक्यता आहे’, असे सांगून गर्भधारणा संपुष्टात आणण्याची अनुमती दिली होती; मात्र नंतर वैद्यकीयदृष्ट्या ते हानीकारक नसल्याचे समोर आले. नंतर मुलीने बाळाला जन्म दिला. नवजात बालकाचे संरक्षण हे राज्याचे कर्तव्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने त्याच्या आदेशात पुढे म्हटले आहे की, भविष्यात आपल्या समाजात अशा प्रकारचे घातपात होणार नाही, याची काळजी घ्यावी. आई-वडिलांना आणि पीडित मुलीच्या त्रासाची कल्पनाही करता येत नाही. सुरक्षित लैंगिक संबंधाबद्दल माहिती नसल्यामुळे हे घडले. अल्पवयीन मुले इंटरनेटच्याही पुढे असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.

संपादकीय भूमिका

भारतीय कुटुंबपद्धतीला काळीमा फासणारी ही घटना आहे. यास लैंगिक शिक्षणाचा अभाव यापेक्षा नैतिक मूल्यांची घसरण कारणीभूत आहे. समाजाचा घात करणार्‍या अशा घटनांपासून वाचण्यासाठी अध्यात्माधारित शिक्षण आणि सामाजिक भान जपणारे जागृतीपर नैतिक मूल्यसंवर्धन हाच एकमेव उपाय आहे. यासंदर्भात जागृती करून सरकारने ठोस पावले उचलायला हवीत !