तांदूळाच्‍या वाटपामध्‍ये केंद्र सरकार राजकारण करत आहे ! – सिद्धरामय्‍या, मुख्‍यमंत्री, कर्नाटक

सिद्धरामय्‍या, मुख्‍यमंत्री, कर्नाटक

सांगली – कर्नाटकात प्रत्‍येक कुटुंबाला विनामूल्‍य तांदूळ देण्‍याचा निर्णय आम्‍ही घेतला आहे; मात्र केंद्रातील भाजप सरकारने ‘फूड कॉर्पोरेशन’ला कर्नाटकला तांदूळ देऊ नये, अशी समज दिली आहे. केंद्र सरकारकडे आम्‍ही फुकट तांदूळ मागत नाही, तर तो विकत घेऊन आम्‍ही विनामूल्‍य वाटणार आहे. केंद्रातील भाजप सरकार गरिबांच्‍या विरोधातील सरकार आहे. त्‍यामुळे गरीब जनतेला विनामूल्‍य तांदूळ मिळू नये, असा त्‍यांचा प्रयत्न असून तांदूळाच्‍या वाटपामध्‍ये भाजप सरकार राजकारण करत आहे, असा आरोप कर्नाटकचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांनी केला. सिद्धरामय्‍या यांचा सांगलीत काँग्रेस पक्षाच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला. त्‍या प्रसंगी त्‍यांनी हा आरोप केला. (ज्‍यांना आवश्‍यक आहे त्‍यांना आवश्‍यक त्‍या सुविधा दिल्‍या पाहिजेत; मात्र सरसकट जनतेला विनामूल्‍य वीज, तसेच अन्‍य सुविधा देऊन जनतेला फुटकची सवय लावून, तसेच महसूल बुडवून काँग्रेसचे कर्नाटकातील सरकार राज्‍याची पर्यायाने राष्‍ट्राची हानी करत आह ! – संपादक)

सिद्धरामय्‍या पुढे म्‍हणाले की, महाराष्‍ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार भ्रष्‍ट आहे. त्‍यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्‍ट्रातून कोणत्‍याही परिस्‍थितीत नेस्‍तनाबूत करून उखडून टाकले पाहिजे. (‘भ्रष्‍टाचार म्‍हणजे शिष्‍टाचार ’ हे घोषवाक्‍य देऊन इंदिरा गांधींनी ते अमलात आणले. असे नेते असणार्‍या काँग्रेसच्‍या नेत्‍यांना हे बोलण्‍याचा अधिकार काय ? – संपादक) कर्नाटक सरकार पदवीधरांना बेरोजगार भत्ता देण्‍याचे काम करत आहे. (पदवीधर झालेल्‍यांना बेरोजगार भत्ता देण्‍यापेक्षा त्‍यांच्‍यातील उद्योगशीलता कशी वाढेल ? ते स्‍वत:च्‍या पायावर कसे उभे रहातील ? याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे ! काँग्रेसच्‍या फुकट देण्‍याच्‍या वृत्तीमुळेच देशवासियांची पुष्‍कळ हानी झाली आहे. – संपादक)