भारतात जात, पंथ, लिंग असा कोणताही भेदभाव केला जात नाही ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांचा अमेरिका दौरा

वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्ही लोकशाही जगतो. लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित असलेल्या आमच्या राज्यघटनेच्या आधारे आमचे सरकार काम करते. भारतात जात, पंथ, लिंग असा कोणताही भेदभाव केला जात नाही. मानवी मूल्ये आणि मानवाधिकार नसेल, तर लोकशाहीच टिकणार नाही. भारत सर्वांची साथ, सर्वांचा विश्‍वास आणि सर्वांचे प्रयत्न या आधारावर चालतो, असे उत्तर पंतप्रधान मोदी यांनी येथे पत्रकारांच्या प्रश्‍नांच्या उत्तरात दिले. द्विपक्षीय बैठक घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी भारतातील मानवाधिकार आणि अल्पसंख्यांक यांच्याविषयी प्रश्‍न विचारण्यात आले. यावर नरेंद्र मोदी यांनी वरील उत्तर दिले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत एक लोकशाही असलेले राष्ट्र आहे. आमच्या गुणसूत्रामध्येच (डी.एन्.ए.मध्येच) लोकशाही आहे. लोकशाही आमचा आत्मा आहे. लोकशाही आमच्या धमण्यांमध्ये आहे. आम्ही लोकशाही जगतो. आमची राज्यघटना आणि आमच्या सरकारने सिद्ध केले आहे की, लोकशाहीच सर्वांचा उद्धार करू शकते.