गोतस्करांकडून गोरक्षकांवरील आक्रमणाच्या विरोधात नांदेड बंद !

अप्पारावपेठेत झालेल्या आक्रमणात एका गोरक्षकाचा मृत्यू, सहा जण घायाळ

नांदेड बंद (प्रतिकात्मक चित्र)

नांदेड – येथे १९ जूनच्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी गोरक्षकांवर आक्रमण केले होते. या आक्रमणाच्या निषेधार्थ २१ या दिवशी विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि गोरक्षक यांच्याकडून ‘नांदेड बंद’ची हाक देण्यात आली होती. किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ येथे चारचाकी वाहनातून जाणार्‍या गोरक्षकांवर एका टोळीने शस्त्रांनी प्राणघातक आक्रमण केले. या आक्रमणात १ जण ठार झाला असून ४ जण गंभीर घायाळ, तर २ जणांना किरकोळ मार लागला आहे. ईस्लामपूरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे यांनी सांगितले, ‘या प्रकरणातील आक्रमणकर्त्यांना आम्ही लवकरच अटक करू.’ या घटनेनंतर शीघ्र कृती दल, केंद्रीय पोलीस बल यांसह स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाडा जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे. शिवणी परिसरातील गोरक्षक नेहमीच तेलंगाणात होत असलेली गोतस्करी उघड करत असतात.

याविषयी गोरक्षक सोपान रेड्डी पेंटेवार यांनी सांगितले, ‘१९ जून या दिवशी महेश कोंडवाड, ज्ञानेश्‍वर कार्लेवाड, बालाजी राहुलवाड, विठ्ठल लक्ष्मण अनंतवार, विशाल मेंढेवाड, बालाजी कार्लेवाड, शेखर रापेल्ली असे सर्व जण सातार्‍यात एका वैयक्तिक कार्यक्रमासाठी गेलो होते. सातारा येथून परत येतांना रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आप्पारावपेठ येथून जात असतांना एका पांढर्‍या रंगाचे पिकअप वाहन आमच्या समोर जात होते. या गाडीविषयी आम्हाला शंका आली आणि म्हणून ती आम्ही अडवली. तेव्हा गाडीतील केबीनमधून ३-४ जण, मागील बाजूतून ५-६ जण आणि समोरून आलेल्या दुचाकीवरील काही जण अशा एकूण १२ ते १५ जणांनी आमच्यावर आक्रमण केले. त्यांनी लाठ्या-काठ्या, चाकू आदी शस्त्रांचा वापर केला. या आक्रमणात शेखर रापेल्ली हे मरण पावले. आक्रमणकर्त्यांनी गोरक्षकांच्या गाडीची तोडफोड करून पुष्कळ हानी केली.’

संपादकीय भूमिका

महाराष्ट्रात गोतस्कर हे गोरक्षकांवर आक्रमण करून ठार मारतात, हे संतापजनक. वास्तविक गोतस्करांच्या कारवायांवर आळा घालण्याची मागणी करण्यासाठी ‘बंद’ पाळण्याची वेळ गोप्रेमींवर येऊ नये, असेच हिंदूंना वाटते !