पंतप्रधान मोदी यांचा मी चाहता झालो आहे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांचे विधान !

उद्योगपती इलॉन मस्क व पंतप्रधान नरेंद्र मोदी

वॉशिंग्टन (अमेरिका) – टि्वटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच ‘टेस्ला’ आस्थापनाचे मालक इलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ‘आम्हा दोघांची भेट झाल्यानंतर मी फार आनंदी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी जी चर्चा केली, ती फारच सकारात्मक स्तरावर झाली. पुढच्या वर्षी मी भारतात येण्याचाही विचार करत आहे. मोदी यांच्या भेटीनंतर मी त्यांचा चाहता  झालो आहे’, असे उद्गार इलॉन मस्क यांनी काढले. ‘टेस्ला मोटर्स’ हे आस्थापन भारतात कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने जागेच्या शोधात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर इलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मस्क यांनी म्हटले की, ‘टेस्ला’ लवकरच भारतात येईल. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. भविष्यात आम्ही मोठी घोषणा करू. भारतात गुंतवणूक करणे, हे निश्‍चित महत्त्वाचे आहे.

मोदी यांची मान्यवरांनी घेतली भेट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे अनुमाने २४ मान्यवरांनी भेट घेतली. यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते, अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, शास्त्रज्ञ, विद्वान आणि व्यापारी यांचा समावेश आहे. लेखक आणि शैक्षणिक प्राध्यापक रॉबर्ट थर्मन, निबंधकार आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ प्राध्यापक नसीम निकोलस तालेब, खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक नील डीग्रास टायसन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ पॉल रोमर, तसेच  गुंतवणूकदार रे डालिओ यांचा यात समावेश आहे.

स्थानिक सरकारांच्या नियमांचे पालन करणे योग्य !

जॅक डॉर्सी यांच्या भारत सरकारवरील आरोपांवर इलॉन मस्क यांनी दिले उत्तर !

पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी इलॉन मस्क यांना ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी भारतावर केलेल्या टीकेविषयी प्रश्‍न विचारला. त्यावर इलॉन मस्क म्हणाले की, कोणत्याही सामाजिक माध्यमाला स्थानिक सरकारच्या नियमांचे पालन करण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. पर्याय असलाच, तर ते सामाजिक माध्यम बंद करण्याचा. त्यामुळे जे चांगले आहे, ते केले पाहिजे. यापेक्षा वेगळे काही करणे अशक्य आहे.

सौजन्य: Zee Hindustan

डॉर्सी यांनी भारत सरकारवर आरोप केला होता की, ट्विटरवरून कृषी कायद्यांना  विरोध करणार्‍यांची खाती सरकारने बंद करण्यास सांगितले होते. त्यासाठी सरकारने माझ्यावर दबाव आणला होता.