‘१४.६.२०२३ या दिवशी एकादशीच्या तिथीला रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाच्या परिसरात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धर्मध्वजाचे भक्तीमय वातावरणात पूजन केले. त्या वेळी झालेल्या सूक्ष्म परीक्षणाचा काही भाग १७.६.२०२३ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
भाग १ : https://sanatanprabhat.org/marathi/692914.html
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धर्मध्वजाचे क्षात्रभावाने आरोहण करणे
या वेळी धर्मध्वजामध्ये सुप्तावस्थेत असणारे धर्मतत्त्व प्रगट होऊन ते संपूर्ण वायूमंडलात वेगाने प्रक्षेपित झाले. त्यामुळे संपूर्ण वातावरण धर्मतत्त्वामुळे भारित झाले. त्यामुळे या धर्मध्वजाचे रूपांतर ‘विजयध्वज’ आणि ‘ब्रह्मध्वज’ यांमध्ये झाले. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेतील समस्त बाधांचे निवारण होऊन हिंदु धर्माची कीर्ती संपूर्ण जगात होऊन आधी ‘कृण्वन्तो विश्वम् आर्यम् ।’, म्हणजे ‘संपूर्ण विश्वाला ‘आर्य’, म्हणजे सुसंस्कृत करू’, हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून संपूर्ण विश्वात हिंदु धर्माचा प्रसार होणार आहे. त्यामुळे या विश्वाचे रूपांतर ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’, म्हणजे ‘संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे’, या विश्वव्यापी मूलमंत्रात होऊन संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे.
टीप : धर्मध्वजातून प्रामुख्याने धर्मतेजाचे प्रक्षेपण होते. तसेच आवश्यकतेनुसार क्षात्रभाव वाढवण्यासाठी क्षात्रतेज, जिज्ञासा वृद्धींगत करणारे ब्राह्मतेज, भक्तीचा प्रसार सर्वत्र करण्यासाठी भक्तीतेज अन् धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांचा प्रसार करण्यासाठी ज्ञानतेज यांचे प्रक्षेपण होते.
५. देवतांचे श्लोक आणि मंत्र, तसेच घोषणा दिल्यामुळे सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम
धर्मध्वजाचे पूजन चालू असतांना सनातनचे पुरोहित साधक भावपूर्णरित्या देवतांचे श्लोक आणि मंत्र म्हणत होते. त्यामुळे विधीला उपस्थित असणारे धर्मप्रेमी, साधक, संत आणि सद़्गुरु यांची काही वेळा चंद्रनाडी, तर काही वेळा सुषुम्नानाडी चालू होऊन त्यांच्यामध्ये तारकभाव जागृत होत होता.
धर्मध्वजाचे आरोहण केल्यावर जेव्हा सर्वांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ हा जयघोष केला, तेव्हा धर्मवीर, साधक, संत आणि सद़्गुरु यांची सूर्यनाडी चालू होऊन त्यांचा क्षात्रभाव अन् मारकभाव जागृत झाला.
६. सनातनच्या साधक पुरोहितांनी राष्ट्राच्या उत्कर्षासाठी उपनिषदांमधील मंत्र भावपूर्णरित्या म्हणण्याचे होणारे लाभ
या मंत्रांतील मंत्रशक्तीसह धर्मस्थापनेसाठी श्रीकृष्ण आणि राष्ट्रोत्कर्षासाठी श्री दुर्गादेवी यांची संयुक्त संकल्पशक्ती कार्यरत झाल्यामुळे समस्त देवता आणि ऋषिमुनी यांचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृपाशीर्वाद मिळाले. त्यामुळे हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी ज्ञानसंपन्न, सर्वगुणसंपन्न, जयशाली, वीर, पराक्रमी, तेजस्वी, ज्ञानी आणि धर्मपरायण दैवी पिढीची निर्मिती होणार आहे. तसेच हिंदु राष्ट्राच्या समृद्धीमध्ये वृद्धी करण्यासाठी सबळ पशूधन आणि नैसर्गिक संपन्नता लाभणार आहे.
७. भारताभोवती संरक्षककवच निर्माण होणे
अशा प्रकारे हिंदु धर्माच्या विजयाचे प्रतीक असलेल्या धर्मध्वजाचे पूजन आणि आरोहण झाल्यामुळे प्रथम भारत देशाच्या भोवती श्री दुर्गादेवीच्या मारक शक्तीचे आणि भगवान श्रीकृष्णाच्या तत्त्वमय चैतन्याचे संरक्षककवच निर्माण झाल्याचे जाणवले. त्यामुळे भारताची सात्त्विकता वाढून येथे रहाणारे नागरिक राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या विचारांनी प्रेरित अन् कृतीशील होऊन ते हिंदु राष्ट्रस्थापनेच्या दैवी कार्याशी जोडले जाणार आहेत.
८. धर्मध्वजातून प्रक्षेपित झालेले धर्मतेज आणि चैतन्य यांच्या लहरी संपूर्ण विश्वात पसरणे
त्यामुळे संपूर्ण पृथ्वीच्या वायूमंडलाची शुद्धी होऊन ते धर्मतेज आणि चैतन्य यांनी भारित झाले. अशाप्रकारे धर्म आणि अधर्म यांच्या सूक्ष्मातील लढ्यामध्ये धर्माचा विजय होऊन लवकरच पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याची चाहूल सर्वांना लागली.
प्रार्थना आणि कृतज्ञता
हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने होण्याकरता धर्मप्रेमी, साधक, संत आणि सद़्गुरु यांनी समस्त देवता, ऋषिमुनी आणि हिंदु राष्ट्राचे अध्वर्यु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना याचकभावाने प्रार्थना केल्यामुळे त्यांना समस्त देवतांचे कृपाशीर्वाद लाभल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे ‘धर्मध्वजपूजन आणि धर्मध्वजारोहण हे आध्यात्मिक इतिहासातील सुवर्ण क्षण प्रत्यक्ष पहाण्यास अन् अनुभवण्यास मिळाले’, यासाठी धर्मवीर, साधक, संत आणि सद़्गुरु यांनी अत्यंत कृतज्ञताभावाने श्रीगुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा त्यांच्या मनातील भाव विविध रंगांच्या पुष्पांच्या रूपाने श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पावन चरणी अर्पित झाल्याचे जाणवले.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.६.२०२३)
(समाप्त)
|