सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडे (वय १०० वर्षे) यांचा देहत्याग !

पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी

फोंडा (गोवा) – आनंदी, निर्मळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडे (वय १०० वर्षे) यांनी १३ डिसेंबरच्या रात्री ८ वाजून २० मिनिटांनी देहत्याग केला. त्या ढवळी, फोंडा येथे वास्तव्यास होत्या. १४ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे, तसेच पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्यासह सनातनचे अन्य संत आणि साधक यांनी पू. लोखंडेआजी यांचे अत्यंदर्शन घेतले.

पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडे यांच्या पश्‍चात २ मुली, ८ नातवंडे, ४ नातसुना, ४ नातजावई आणि १२ पतवंड आहेत. त्यांची मुलगी श्रीमती इंदुबाई श्रीधर भुकन (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) या रामनाथी, येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करतात. नातू श्री. रामेश्‍वर भुकन हिंदु जनजागृती समितीचे कार्य करतात, तर दुसरा नातू श्री. वाल्मिक भुकन, नात सौ. मनिषा गायकवाड, दोन्ही नातसुना, नातजावई आणि पतवंडे आदी कुटुंबीय सनातनच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ साधनारत आहेत. त्याचप्रमाणे पू. लोखंडेआजी यांचे अन्य कुटुंबीयही अन्य संप्रदायानुसार साधना करतात.

७ फेब्रुवारी २०१७ या दिवशी पू. (श्रीमती) लोखंडेआजी संतपदी विराजमान झाल्या होत्या. त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले अन् त्यांच्या उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रती अपार भाव होता. त्या मूळच्या मांडवगण, तालुका श्रीगोंडा, जिल्हा अहिल्यानगर येथील असून मागील ९ वर्षांपासून ढवळी येथे वास्तव्यास होत्या. देहत्यागानंतर पू. आजींचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी, पिवळा आणि शांत दिसत होता. वातावरणातही अधिक प्रमाणात चैतन्य जाणवत होते.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना व्हिडिओद्वारे पू. लोखंडेआजींचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी ‘पू. लोखंडे आजी यांचा चेहरा तेजस्वी दिसला आणि पू. लोखंडेआजींच्या देहातून प्रकाश बाहेर पडत आह. त्या ध्यानात आहेत आणि त्यांचा जप चालू आहे’, असे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना जाणवले. ‘पू. लोखंडेआजी यांनी सनातनच्या कार्यासाठी सूक्ष्मातून मोठे योगदान दिले आहे. मला आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना नेहमीच त्यांचे स्मरण राहील’, असेही त्या म्हणाल्या.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार सद्गुरु/साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक