‘१४.६.२०२३ या दिवशी एकादशीच्या तिथीला रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाच्या परिसरात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धर्मध्वजाचे भक्तीमय वातावरणात पूजन केले. देवाच्या कृपेने त्या वेळी झालेल्या सूक्ष्म परीक्षणाची भावसूत्रे येथे लेखबद्ध करून ती धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पितभावाने अर्पण करत आहे.
१. धर्मध्वजाच्या पूजनविधीचा आरंभ होण्यापूर्वीची सूत्रे !
१ अ. धर्मध्वजाच्या पूजनापूर्वीचे वातावरण : धर्मध्वजाच्या पूजनाची तिथी ‘एकादशी’ ही पवित्र तिथी असल्यामुळे धर्मध्वजाच्या पूजनापूर्वीच आश्रमाच्या वातावरणात देवता, ऋषिमुनी आणि पुण्यात्मे यांचे शुभागमन झाल्याचे जाणवले. त्यामुळे वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य कार्यरत झाले होते. त्यामुळे ‘धर्मध्वजाचे पूजन आणि त्याचे आरोहण (फडकवणे)’, या घटना पहाण्यासाठी संपूर्ण सृष्टी आतूरतेने वाट पहात होती. आकाशातून पृथ्वीकडे येणार्या दैवी शक्तींच्या चैतन्यदायी लहरींच्या प्रवाहामुळे निसर्गाला आनंद झाला होता. त्यामुळे विधीला प्रारंभ होण्यापूर्वी आजूबाजूच्या परिसरातील २ मोर रोमांचित झाले होते. त्यामुळे हर्षोल्हासित झालेल्या मोरांच्या केका (ओरडण्याचा आवाज) २ – ३ वेळा ऐकू आल्या. तो केका ऐकल्यावर माझेही मन रोमांचित होऊन माझ्या अंगावर शहारे आले. यावरून ‘धार्मिक विधींचा परिणाम निसर्गावर कशाप्रकारे होतो?’, हे सूत्र मला शिकायला मिळाले. तसेच धर्मध्वजाच्या पूजनाच्या आधी मोरांचा केका ऐकू येणे’, ही ‘भगवान श्रीकृष्णाने त्याच्या सूक्ष्मातील उपस्थितीची दैवी साक्ष दिली आहे’, असे जाणवले.
१ आ. आदरणीय संत आणि सद़्गुरु यांचे कार्यस्थळी शुभागमन झाल्यावर सूर्यनारायणाचा ताप न्यून होऊन तो सौम्य होणे : जेव्हा कार्यस्थळी आदरणीय संत आणि सद़्गुरु यांचे शुभागमन झाले, तेव्हा सूर्यनारायण त्यांचे दर्शन घेण्यासाठी आकाशात क्षणभर थांबल्याचे जाणवले. संत आणि सद़्गुरु यांची हिंदु धर्माप्रतीची निस्सीम भक्ती पाहून सूर्यनारायण प्रसन्न झाल्याचे जाणवले. त्याचे मारक रूप शांत होऊन त्याचे तारक रूप कार्यरत झाले. त्यामुळे सूर्याचा ताप न्यून होऊन तो सौम्य झाल्याचे जाणवले. वातावरणात स्थुलातून जाणवणारी उष्णता न्यून झाली आणि पुष्कळ गारवा निर्माण झाला. तेव्हा सूर्यनारायणामध्ये श्रीमन्नारायणाचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होऊन ते वायूमंडलात प्रक्षेपित झाल्याचे जाणवले. यावरून ‘द्युलोकात (प्रकाशलोकात) वास करणार्या देवतांनाही पृथ्वीवर धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी झालेले धर्मवीर, साधक, संत आणि सद़्गुरु यांना पाहून पुष्कळ आनंद होतो’, हे सूत्र मला अनुभवण्यास मिळाले.
२. धर्मध्वजाच्या पूजनविधीच्यावेळी सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे !
२ अ. विविध देवतांना वंदन करून धार्मिक विधीचा आरंभ होणे : वास्तुदेवता, स्थानदेवता श्री दक्षिणमुखी हनुमान, ग्रामदेवता श्री वाग्जाईदेवी आणि कार्यस्थळी असलेल्या मंदिरातील श्री तनोटमाता, श्री त्रिनेत्र गणेश आणि महर्षि व्यासांची शिळा यांना वंदन करून धर्मध्वजाच्या पूजनविधीचा आरंभ झाला. तेव्हा सूक्ष्मातून पुढील सूत्रे जाणवली.
२ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धर्मध्वजाचे भक्तीमय वातावरणात पूजन करणे
टीप : मंत्रपुष्पांजलीच्या आधी सनातनच्या पुरोहित साधकांनी श्रीराम आणि सद़्गुरु यांचे गायत्री मंत्र म्हटले. त्यामुळे वातावरणात रामतत्त्व आणि गुरुतत्त्व यांच्या तेजोमय लहरी कार्यरत झाल्या. रामतत्त्वामुळे साधकांचा हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारा समष्टीभाव आणि गुरुतत्त्व यांमुळे साधकांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतीचा व्यष्टी स्तरावर आवश्यक असणारा शिष्यभाव जागृत झाला. अशा प्रकारे व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर आवश्यक असणारे भाव साधकांमध्ये जागृत झाल्यामुळे त्यांच्याकडून गुरुकृपायोगांतर्गत व्यष्टी आणि समष्टी साधना अधिकाधिक भावपूर्ण अन् परिपूर्ण होण्यास गती मिळाली.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.६.२०२३)
भाग २ : https://sanatanprabhat.org/marathi/693435.html
(क्रमश:)
|